अनेक खस्ता खाऊन आई-वडील आपल्या मुलांचे उत्तम भविष्य घडवण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु हीच मुलं मोठी झाल्यावर आईवडिलांना एकटं सोडतात. वृद्धापकाळात मुलांकडून चार प्रेमाचे शब्द ऐकण्याची त्यांना इच्छा असते. मात्र आई-वडिलांची एवढीही अपेक्षा मुलं पूर्ण करू शकत नाहीत, तेव्हा आई-वडिलांनी कोणाकडून प्रेमाची अपेक्षा ठेवावी? असा सवाल करणाऱ्या दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर यांनी त्यांच्या ‘जुनं फर्निचर’ या चित्रपटातून ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. २६ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या निमित्ताने महेश मांजरेकर, निर्माते यतीन जाधव आणि कलाकार सचिन खेडेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर यांनी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयाला भेट देत मनमोकळया गप्पा मारल्या.
दहा वर्षांपूर्वी या चित्रपटाची कथा लिहिण्यात आली होती. मग हा चित्रपट मोठया पडद्यावर येण्यासाठी एवढा कालावधी का लागला ते या चित्रपटाचं नाव ‘जुनं फर्निचर’ का? यामागचं इंगित उलगडताना महेश मांजरेकर म्हणाले, ‘हा चित्रपट पालकांबरोबर मुद्दाम वाईट वागणाऱ्या मुलांवर आधारित नाही. तर आपण आई-वडिलांना किती गृहीत धरतो हे जाणवून देण्याचा प्रयत्न आहे. माझी आई गेल्यानंतर मी ती हयात असताना तिला किती गृहीत धरलं होतं हे माझ्या हळूहळू लक्षात येत गेलं. त्यामुळे स्वानुभवातून ही कथा कागदावर उतरत गेली. एकदा आई-वडिलांचं छत्र हरपलं की मग आपल्या चुका आठवत जातात. त्यांची माफी मागावीशी वाटते. पण ते समोर नसतात. या दु:खाची जाणीव झाल्यानंतर त्यावर कथा लिहायला सुरुवात झाली. आपण नेहमी जुनं नको असलेलं फर्निचर अडगळीच्या खोलीत टाकून देतो. खरंतर त्या फर्निचरला थोडं पॉलिश केलं, त्याची डागडुजी केली तर ते दीर्घकाळ आपल्याला वापरता येतं. नात्यांचंही तसंच असतं. ती टाकाऊ नसतात. त्यांची थोडी काळजी घेतली तरी ते खूप काही देऊन जातात. त्यामुळे या चित्रपटासाठी मला ‘जुनं फर्निचर’ हे शीर्षक समर्पक वाटलं’. चित्रपटातून दोन टक्के लोकांपर्यंत विचार पोहोचला तरी मला समाधान वाटेल, अशी भावनाही मांजरेकर यांनी व्यक्त केली.
वृद्धाश्रम म्हणजे प्रति रुग्णालय नव्हे..
मला आणि मेधाला भविष्यात एक वृद्धाश्रम सुरू करायचा आहे. वृद्धाश्रम म्हणजे फक्त औषधांवर जगण्यासाठी राहण्याची जागा ही संकल्पना मला पटत नाही. ते प्रति रुग्णालय नव्हे. तिथे मनोरंजन, सांस्कृतिक कार्यक्रम, जे जे वाटेल ते करण्याची संधी उपलब्ध असणारी, त्यांच्या हक्काची जागा असली पाहिजे, असं आपल्याला वाटत असल्याचं मांजरेकर यांनी सांगितलं.
हिंदीतली मराठी मुलगी अशी ओळख असलेल्या अभिनेत्री अनुषा दांडेकरने याआधीही महेश मांजरेकर यांच्याबरोबर काम केले आहे. या चित्रपटात काम करताना कधीही पटकथा पहिले हातात न ठेवणाऱ्या मांजरेकरांनी चित्रीकरणाआधी पटकथा दिली; त्यामुळे मराठीत ही भूमिका करणं अधिक सोपं गेलं, असं अनुषाने सांगितलं. ‘मी लहानपणापासून ऑस्ट्रेलियात राहिल्यामुळे उच्चारांमध्ये इंग्रजी हेल अधिक आहेत. पटकथा आणि संवाद आधी हातात मिळाल्यामुळे मला उच्चारावर काम करण्यासाठी वेळ मिळाला. मराठी उत्तम जमत नसलं तरी मी मराठीत बोलायचा नेहमी प्रयत्न करते, असंही तिने सांगितलं.
१९८४ पासूनची आमची ओळख..
अभिनेता सचिन खेडेकर यांनी महेश मांजरेकर यांच्या दिग्दर्शनाखाली अनेक चांगले चित्रपट केले आहेत. अगदी हिंदीत ‘अस्तित्व’ ते मराठीत ‘शिवाजी राजे भोसले बोलतोय’, ‘काकस्पर्श’, ‘कोकणस्थ’ असे चित्रपट केलेल्या सचिन खेडेकर यांनी त्यांच्याबरोबर काम करण्याची आपल्याला सवय असल्याचं सांगितलं. १९८४ पासून आमची ओळख आहे. आम्ही एकमेकांना खूप चांगलं ओळखतो आणि एकत्र खूप कामही केलं असल्याने एकमेकांना काही सांगावं लागत नाही. एकमेकांचे विचार सहज कळतात, असं त्यांनी सांगितलं. या चित्रपटात सचिन खेडेकर न्यायाधीशाच्या भूमिकेत आहेत. ‘न्यायाधीश नेहमी स्थितप्रज्ञ राहून कुठल्याही प्रकरणाच्या दोन्ही बाजू ऐकतात आणि निर्णय देतात. मात्र या चित्रपटाचा विषयच इतका भावनिक आहे की नाही म्हटलं तरी एका क्षणी तेही भावनिकदृष्टया विचार करू लागतात. हा अत्यंत गंभीर विषय मांडण्याची मांजरेकरांची पद्धत कोणालाही आवडेल अशी आहे’, असं खेडेकर यांनी सांगितलं.
अभिनेता भूषण प्रधान याने या चित्रपटात आई-वडिलांकडे दुर्लक्ष करणाऱ्या मुलाची भूमिका केली आहे. गेली अनेक वर्ष महेश मांजरेकर यांच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याची इच्छा या चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण झाल्याचे सांगतानाच चित्रपटाचा विषय एक माणूस म्हणून आपल्याला उलगडत गेला, असं भूषणने सांगितलं. आई-वडिलांना गृहीत धरणं, खूप छोटया छोटया गोष्टी आपण त्यांच्यासाठी करू शकतो, मात्र मुद्दाम त्या टाळल्या जात नसल्या तरी त्याकडे जाणीवपूर्वक लक्षही दिलं जात नाही. हे या चित्रपटातील भूमिका करताना लक्षात आल्याचं त्याने सांगितलं.
‘अभिनयच करायचा होता..’
दिग्दर्शक म्हणून मराठी आणि हिंदी चित्रपटात नावलौकिक मिळवलेल्या महेश मांजरेकर यांनी आपल्याला सुरुवातीपासून अभिनयच करायचा होता असं सांगितलं. ‘अफलातून’ या नाटकात मी पहिल्यांदा काम केलं. त्या वेळी सचिन खेडेकर, सुनील बर्वे, अतुल परचुरे हे कलाकार सोबत होते. मग दूरचित्रवाणीवर मालिका केली. तेव्हा १३ भागांची मालिका असल्याने भूमिका छोटी असो वा मोठी मेहनत करायला लागायची. दिग्दर्शनात रस निर्माण झाला तेव्हा अभिनय करायचा नाही, असं ठरवून टाकलं होतं. पण नंतर बऱ्याच वर्षांनी दिग्दर्शक संजय गुप्तांनी ‘काँटे’ या चित्रपटात भूमिका देऊ केली आणि पुन्हा अभिनयाचा प्रवास सुरू झाला तो आजपर्यंत कायम आहे, असं मांजरेकर यांनी सांगितलं.
‘आपल्या चित्रपटांचे विषय सर्वसमावेशक हवेत’
आपल्याला भाषेचा आणि संस्कृतीचा अभिमान आहे. पण म्हणून सातत्याने प्रेक्षकांना शिवाजी महाराजांवर आधारित चित्रपट, जुन्या नाटकांवर आधारित चित्रपटच आवडतात असा विचार करून तेच चित्रपट केले जातात. त्यामुळे आपल्याकडे एखादा ‘कयामत से कयामत तक’सारखा प्रेमपट केला जात नाही. हा संकुचित विचार बदलून सर्वसमावेशक विषय चित्रपटात असायला हवेत, असं मत सचिन खेडेकर यांनी व्यक्त केलं. आता ओटीटीसारखा मोठा पर्याय उपल्बध असल्याने भाषा कोणतीही असो आपली कलाकृती जगभरातील प्रेक्षक बघू शकतात. आपला विषय संपूर्ण जगापर्यंत आपण पोहोचवू शकतो, असंही खेडेकर यांनी सांगितलं.
तुलनाच अयोग्य ..
मराठी चित्रपटांची स्पर्धा ही थेट हिंदी चित्रपटांशी आहे असं सगळयांना वाटतं. पण मुळात दोनशे कोटींच्या चित्रपटाची स्पर्धा अडीच कोटींच्या मराठी चित्रपटाशी कशी होऊ शकेल?, असा सवाल मांजरेकर उपस्थित करतात. मुळात ओटीटीच्या युगात कुठल्याही भाषेचा चित्रपट त्याच भाषेत सर्वदूर पोहोचवणं शक्य झालं आहे. ‘केजीएफ’, ‘बाहुबली’, ‘कंतारा’सारखे यशस्वी चित्रपट त्यांच्या भाषेतच प्रदर्शित केले गेले. डिबगच्या माध्यमातून ते हिंदीसह अन्य प्रादेशिक भाषांमध्ये पोहोचले. त्यामुळे मराठी चित्रपटांनीही आता न्यूनगंड न बाळगता आपलाही चित्रपट जगभरात आपल्याच भाषेतून पोहोचणार हा विश्वास बाळगला पाहिजे, असा आग्रही मुद्दा त्यांनी मांडला.