‘धर्मवीर… मुक्काम पोस्ट ठाणे’ १३ मे २०२२ रोजी प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली होती. या चित्रपटातून शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचा जीवनप्रवास दाखवण्यात आला होता. या चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका अभिनेता प्रसाद ओकने साकारली होती.
‘धर्मवीर’ला मिळालेल्या यशानंतर काही महिन्यांपूर्वीच या चित्रपटाचा दुसरा भाग ‘धर्मवीर २’ ची घोषणा करण्यात आली होती. आता नुकताच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात ‘धर्मवीर २’ या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला. या मुहूर्ताला चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक ,कलाकार तसेच राजकीय नेते उपस्थित होते.
हेही वाचा-‘अस्तित्व’ नाटक पाहून अभिनेते अजिंक्य देव यांची प्रतिक्रिया, म्हणाले, “भरतने रडवलं…”
मंगेश देसाई यांच्या साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेद्वारे “धर्मवीर २” चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. ‘धर्मवीर २’ चित्रपटाच्या दिग्दर्शनाच जबाबदारी प्रवीण तरडे सांभाळणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागाचेही दिग्दर्शन प्रवीण तरडेनेच केले होते. चित्रपटात आनंद दिघेंची भूमिका अभिनेता प्रसाद ओक साकारणार असून बाकीच्या कलाकारांची नावे गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. ९ डिसेंबरपासून या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.
हेही वाचा- रिंकू राजगुरुला आई-बाबांनी दिलं खास सरप्राइज; फोटो शेअर करत अभिनेत्री म्हणाली…
“धर्मवीर २” चित्रपटाच्या पोस्टरवर भगव्या रंगात’ धर्मवीर २’ आणि “साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट….” अशी टॅगलाईन नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे हा चित्रपट हिंदुत्त्वावर भाष्य करणारा असल्याचा प्राथमिक अंदाज बांधण्यात येत आहे. चित्रपटात कलाकार कोण असणार? हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र ‘धर्मवीर २’ या चित्रपटातून साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट उलगडली जाणार म्हणजे काय,? हे समजून घेण्यासाठी प्रेक्षकांना अजून थोडी वाट पहावी लागणार आहे.