दैनंदिन वेगवेगळे विषय घेऊन त्यावर विनोदी प्रहसनात्मक छोटे छोटे प्रसंग सादर करत लोकांना खळखळून हसवण्याचा प्रयत्न करणारी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील मंडळी ‘चिकी चिकी बुबूम बुम’ या चित्रपटात एकत्र आली आहेत. ‘हास्यजत्रा’च्या माध्यमातून लोकप्रिय झालेले अभिनेते प्रसाद खांडेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. प्रसाद खांडेकर यांचा दिग्दर्शक म्हणून हा दुसरा चित्रपट आहे. मुळात एखाद्या लोकप्रिय शोमधील जवळपास सगळ्याच कलाकार मंडळींना घेऊन चित्रपट करणं हा नावीन्यपूर्ण अनुभव ठरेलच असं नाही. अशावेळी सगळा जोर पटकथेवर येतो. ‘चिकी चिकी बुबूम बुम’ करताना पटकथेपेक्षा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी ‘हास्यजत्रा’तील आपल्या सहकलाकारांच्या विनोदी अभिनयावर दिग्दर्शकाची अधिक भिस्त आहे हे जाणवते.

‘चिकी चिकी बुबूम बुम’ हा पूर्णपणे विनोदी मनोरंजक चित्रपट आहे, मात्र चित्रपटाची कथा आणि त्याची मांडणी लक्षात घेतली तर प्रसाद खांडेकर यांच्या ‘एकदा येऊन तर बघा’ या पहिल्याच दिग्दर्शकीय चित्रपटाची कथा आणि स्वरूप काहीसे असेच होते. एखादा बंगला वा एखादे हॉटेल ही मुख्य वास्तू घेऊन तिथे घडणारे नाट्यमय कथानक अशीच दोन्ही चित्रपटांची मांडणी आहे. दोन्हीकडे कथेतील पात्रं जिथे आहेत तिथे एखादी हत्या घडलेली असणं आणि त्यातून मग निर्माण होणारा गुंता आणि तो सावरताना उडालेला पात्रांचा गोंधळ पाहायला मिळतो. ‘चिकी चिकी बुबूम बुम’ या चिवित्र नावामागे फार काही वेगळा तर्क आहे असं नाही, पण ते काय आहे यासाठी चित्रपट पाहावा लागेल.

लहानपणापासून म्हणजे शाळेपासून एकत्र असलेली मित्रमंडळी ‘रियुनियन’चा बेत आखतात. आणि त्यांच्या भेटीचं ठिकाण असतं ‘काकाचा बंगला’. या बंगल्यात येण्याचं निमंत्रण सगळ्यांना आदित्यकडून मिळतं आणि त्याला या सगळ्या पार्टीच्या आयोजनासाठी त्याचा मित्र वैभवची (स्वप्निल जोशी) मदत मिळते. आदित्य वैभवलाही पार्टीत येण्याचं निमंत्रण देतो. आदित्य, वैभव, टुमदेव, भैय्या, धन्नो आणि रावी यांची पार्टी ऐन रंगात आलेली असताना त्यांना घरात एक मृतदेह असल्याचं लक्षात येतं. आता या मृतदेहाचं काय करायचं? तिथून पळून जायचं, पोलिसांना बोलवायचं की स्वत:च त्या मृतदेहाची विल्हेवाट लावायची… या सगळ्या पर्यायांपैकी ही मित्रमंडळी नेमका कोणता पर्याय निवडतात? या सगळ्या गोंधळातून बाहेर पडतात का, की आणखी नव्या संकटात अडकतात? याची गमतीदार गोष्ट म्हणजे हा चित्रपट आहे.

‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपट मनोरंजन करण्यात मुळीच कमी पडत नाही, त्याचं कारण पटकथेपेक्षा चित्रपटात असलेले कलाकार. चित्रपटाचा पूर्वार्ध हा बऱ्यापैकी पात्रांची ओळख करून देण्यात आणि गोष्टीची पहिली घडी बसवण्यात खर्ची पडला आहे. त्यामुळे पूर्वार्धात इथून तिथून विनोद काढण्याचा बऱ्यापैकी प्रयत्न केला असला तरी गोष्टीत घडणाऱ्या घडामोडी रहस्यमय पद्धतीच्या असल्याने त्या विनोदांचा फारसा प्रभाव पडत नाही. दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे पूर्वार्धातली कथा ही बऱ्यापैकी बंगल्यातील दिवाणखान्यात घडते, चित्रपटातली पात्रं बऱ्यापैकी बंगल्यातील इतर खोल्यांत वावरत असली तरी ती काही सेकंदापुरती असल्याने खरी गोष्ट ही समोर दिसणाऱ्या त्या चार भिंतीत घडते. उत्तरार्ध त्या तुलनेत चांगलाच खुलला आहे. कथानकही वेगाने पुढे सरकते आणि बंगल्याच्या मागचा व्हरांड्याचा भाग, गेस्ट हाऊस अशा जागा पात्रं बदलत राहतात. पात्रांना जागेची मिळालेली मोकळीक आणि त्या प्रसंगांच्या मांडणीतून कलाकारांनी काढलेल्या विनोदाच्या जागा यामुळे किमान उत्तरार्धात चित्रपट खूप हसवतो. वर म्हटल्याप्रमाणे कलाकारांचा विनोदी अभिनय हा या चित्रपटाचा महत्त्वाचा भाग आहे. या सगळ्यांचं एकमेकांबरोबरचं विनोदाचं टायमिंग चांगलं आहे. अनेक ठिकाणी हा अभिनय भडक पद्धतीचा आहे, पण तोवर प्रेक्षकांनी चित्रपटाचा अवकाश स्वीकारलेला असल्याने कलाकारांच्या अभिनयातून उलगडणारी गंमत हाच महत्त्वाचा धागा ठरतो.

प्रसाद खांडेकर आणि चित्रपटात आदित्यच्या भूमिकेत असलेल्या प्रथमेश शिवलकरने मिळून या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. प्रथमेशचा आदित्य, खांडेकरांनी साकारलेला भैय्या यांच्या तुलनेत रोहित मानेने टुमदेवच्या भूमिकेत बऱ्यापैकी गंमत आणली आहे. प्रार्थना बेहरेने धन्नोच्या भूमिकेला आणि प्राजक्ता माळीने रावीच्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातल्या त्यात अभिनेता स्वप्निल जोशी या चौकटीत वेगळाही ठरतो आणि त्याने त्याच्या सहजशैलीत एकदा या सगळ्यांबरोबर एकत्रित मजामस्ती करणारं पात्र आणि दुसऱ्या क्षणी पात्राचं वेगळं अस्तित्व या दोन्ही छटा सफाईने साकारल्या आहेत.

अभिजित चव्हाण, प्रियदर्शिनी इंदलकर, खुद्द सचिन गोस्वामी, निखिल रत्नपारखी, चेतना भट ही सगळी मंडळी चित्रपटात जाऊन येऊन आहेत. प्रत्येकाने आपापल्या वाट्याला आलेली भूमिका पार पाडली आहे. गाणी आणि पार्श्वसंगीत दोन्ही बाबतीत फार काही वेगळं हाती लागत नाही. चित्रपटाचा शेवट आणि शेवटाला येणारं गाणं हा फारतर वेगळा प्रयोग. त्यामुळे विनोदी धाटणीची कथा आणि ‘हास्यजत्रा’तील कलाकार यांच्या जोरावर हा ‘चिकी चिकी बुबूम बुम’ घटकाभर मनोरंजन निश्चितच करतो.

चिकी चिकी बुबूम बुम

दिग्दर्शक : प्रसाद खांडेकर कलाकार : स्वप्निल जोशी, प्रसाद खांडेकर, प्रथमेश शिवलकर, रोहित माने, प्राजक्ता माळी, प्रार्थना बेहरे, अभिजित चव्हाण, प्रभाकर मोरे, वनिता खरात.

Story img Loader