चिन्मय मांडलेकर हा मनोरंजन सृष्टीतील एक बहुआयामी अभिनेता म्हणून ओळखला जातो. आता मराठी बरोबरच हिंदी सिनेसृष्टीतही त्याने आपला ठसा उमटवला आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटातील त्याच्या कामाचं प्रचंड कौतुक झालं. तर सध्या तो ‘गांधी-गोडसे: एक युद्ध’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असतानाच त्याचा चाहत्यांना त्याने आणखीन एक सरप्राईज दिलं आहे. तो लवकरच एका मराठी चित्रपटात झळकणार आहे.
‘आलंय माझ्या राशीला’ असं त्याच्या आगामी चित्रपटाचं नाव आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार टिझर प्रदर्शित झाला असून अल्पावधीतच तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटात चिन्मय मध्यवर्ती भूमिकेत असून विविध राशींच्या गमतीजमती त्यांची वैशिष्ट्य आपल्याला चित्रपटातून जाणून घेता येणार आहेत.
आणखी वाचा : “ज्यांना वाद निर्माण करायची इच्छा असेल त्यांनी…,” नथुराम गोडसेच्या भूमिकेबाबत चिन्मय मांडलेकरचं रोखठोक मत
प्रत्येक राशींची काही स्वभाववैशिष्ट्यं, सौंदर्य आहेत. या वैशिष्टय़ांचा मानवी जीवनावर खूप मोठा प्रभाव असतो. याच सौंदर्याची गंमत दाखविणारा, राशींच्या उत्सुकतेला अभ्यासाच्या आणि विज्ञानाच्या आधारे जोडणाऱ्या ‘आलंय माझ्या राशीला’ चित्रपटाचं दिग्दर्शन अजित शिरोळे यांनी केलं आहे. सुप्रसिद्ध वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर आणि अश्विनी पिंपळकर चित्रपटाचे निर्माते आहेत.
हेही वाचा : तिसऱ्या वीकेण्डला ‘वेड’ची दमदार कामगिरी, सुरु केली ५० कोटींकडे वाटचाल
अभिनेते चिन्मय मांडलेकर सोबत अलका कुबल, मोहन जोशी, निर्मिती सावंत, प्रसाद ओक, अतुल परचुरे, मंगेश देसाई, उषा नाईक, भार्गवी चिरमुले, अश्विनी कुलकर्णी, स्वप्निल राजशेखर, पौर्णिमा अहिरे, दिगंबर नाईक, संग्राम चौगुले, सिद्धार्थ खिरीड, प्रणव पिंपळकर यांच्या या चित्रपटात दमदार भूमिका आहेत. १० फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.