मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या ‘सुभेदार’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या चित्रपटात सुभेदार तानाजी मालुसरे यांची कथा आणि कोंढाण्याची लढाई दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ‘सुभेदार’च्या संपूर्ण टीमने पुण्यातील सिंहगडाला भेट दिली होती. या वेळी अभिनेता चिन्मय मांडलेकरने मीडियाशी संवाद साधताना चित्रपटाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या.
‘सुभेदार’ हा ‘श्री शिवराज अष्टक’ मालिकेचा पाचवा भाग असल्याने या मालिकेच्या सगळ्या चित्रपटांमध्ये अभिनेता चिन्मय मांडलेकरने छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. महाराजांच्या भूमिकेबाबत जेव्हा पहिल्यांदा विचारणा झाली तेव्हा मनात काय भावना होती? याबाबत सांगताना अभिनेता म्हणाला, “दिग्पालने ‘तू माझा सांगती’ या मालिकेच्या शूटिंगदरम्यान मला चित्रपटाची स्क्रिप्ट वाचायला दिली होती. तेव्हा मला काहीच कल्पना नव्हती. सुरुवातीला वाटले दिग्पाल माझा मित्र असल्याने मला चित्रपटात लहानशी भूमिका देईल. पण, जेव्हा त्याने मला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार का? असा प्रश्न विचारला तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं…”
हेही वाचा : “२० वर्षे एकच मोबाइल फोन…”, पंकज त्रिपाठींनी वैयक्तिक आयुष्याबद्दल केला खुलासा; म्हणाले, “मी व्हॉट्सॲप…”
“महाराजांची भूमिका साकारणे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. मला माझ्या आयुष्यात एवढे मोठे गिफ्ट आजपर्यंत कोणीही दिले नव्हते. दिग्पालचा इतिहासावर प्रचंड अभ्यास आहे. फार कमी लोकांना आपला इतिहास कसा मांडायचा याची जाणीव होते. त्यापैकी एक व्यक्ती म्हणजे दिग्पाल…त्याने या मालिकेतील प्रत्येक चित्रपटाचे लेखन खूप विचारपूर्वक केले असून त्याच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे.” असे चिन्मय मांडलेकरने सांगितले.
हेही वाचा : “प्रिय पप्पा…”, सासरे विलासराव देशमुख यांच्या आठवणीत जिनिलीयाने शेअर केली भावुक पोस्ट
दरम्यान, ‘सुभेदार’ चित्रपट येत्या १८ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात मृणाल कुलकर्णी यांनी राजमाता जिजाऊ आणि चिन्मय मांडलेकरने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तसेच चित्रपटात अभिनेते अजय पूरकर हे सुभेदार तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारणार आहेत. याशिवाय शिवानी रांगोळे, विराजस कुलकर्णी, स्मिता शेवाळे, अभिजीत श्वेतचंद्र, समीर धर्माधिकारी या कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.