उत्तम अभिनेता व लेखक म्हणून चिन्मय मांडलेकरला ओळखलं जातं. आपल्या दमदार अभिनयाने त्याने प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. परंतु, सध्या एका वेगळ्याच विषयामुळे चिन्मय चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुलाचं नाव ‘जहांगीर’ ठेवल्यामुळे त्याला ट्रोल करण्यात येत आहे. याबाबत शनिवारी ( २० एप्रिल ) एक व्हिडीओ शेअर करत त्याच्या पत्नीने योग्य ते स्पष्टीकरण दिलं होतं. परंतु, या सगळ्याचा संबंध काही ट्रोलर्सनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेशी जोडल्यामुळे वैयक्तिक आयुष्यात चिन्मयने मोठा निर्णय घेतला आहे.
चिन्मय मांडलेकरने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत “मला शिवरायांच्या भूमिकेमुळे लाखो लोकांचं प्रेम मिळालं. पण, त्या भूमिकेमुळे माझ्या कुटुंबाला अशा पद्धतीचा मानसिक त्रास होणार असेल, तर मी अतिशय नम्रपणे सांगू इच्छितो की, इथून पुढे मी ही भूमिका करणार नाही. एक वडील, नवरा म्हणून माझं कुटुंब जपणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे त्यामुळे छत्रपती शिवरायांची क्षमा मागून, या भूमिकेची रजा घेतो.” असं त्याने स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा : “चित्रपट सपशेल आपटला अन्…”, ‘त्या’ कठीण काळात अवधूत गुप्तेला कोणी दिली साथ? पहिल्यांदाच केला खुलासा
चिन्मयने घेतलेल्या या मोठ्या निर्णयामुळे त्याच्या चाहत्यांसह मनोरंजनविश्वातील अनेक कलाकारांना धक्का बसला आहे. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे व गौतमी यांनी पोस्ट शेअर करत या संदर्भात काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
मृण्मयी लिहिते, “ट्रोलिंगमुळे किती गोष्टी गमवायच्या? एखाद्याला इतका त्रास द्यावा की, त्याला इतका मोठा त्रासदायक निर्णय घ्यावासा वाटला? आणि हाही विचार नाही की, कदाचित त्या comments त्यांची मुलं सुद्धा वाचत असतील? घरचे बघत असतील? संवेदना इतक्या बोथट झाल्या आहेत?”
चिन्मयने शेअर केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. त्याचे चाहते दादा असा निर्णय घेऊ नकोस अशी विनंती करत त्याला पाठिंबा देत आहेत. दरम्यान, शिवराज अष्टक मालिकेतील आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या पाचही चित्रपटांमध्ये चिन्मय मांडलेकरने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. त्यामुळे अभिनेत्याने घेतलेल्या या निर्णयामुळे चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण पसरलं आहे.