मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता चिन्मय मांडलेकरची पत्नी नेहा जोशी-मांडलेकर आता निर्माती म्हणून काम करताना दिसत आहे. सध्या रंगभूमीवर जोरदार सुरू असलेल्या ‘गालिब’ नाटकाच्या निर्मितीची धुरा नेहाने सांभाळली आहे. अभिनेता विराजस कुलकर्णी व अभिनेत्री गौतमी देशपांडे यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘गालिब’ नाटकाचं लेखन-दिग्दर्शक चिन्मयने केलं आहे. या नाटकांचं चांगलंच कौतुक होतं असून अनेक पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे. अशातच या नाटकाची निर्माती नेहा जोशी-मांडलेकर हिने मल्याळम भाषेची आवड कशी लागली? याविषयी सांगितलं आहे.
नेहा जोशी-मांडलेकरने तिच्या इन्स्टाग्रामच्या बायोमध्येही मल्याळम भाषेत ‘मल्याळी मुलगी’ असं लिहिलं आहे. याचं विषयी नेहाला ‘आपली सोसल वाहिनी’ या युट्यूब चॅनलवरील ‘बिहाइंड दी सक्सेस’ या कार्यक्रमात विचारण्यात आलं. तेव्हा तिने मल्याळमची आवड कशी निर्माण झाली? याबाबत सविस्तर सांगितलं.
हेही वाचा – ऑनलाइन ओळख, कच्चे तळलेले बोंबील ते लग्नाची मागणी; चिन्मय मांडलेकरच्या पत्नीने सांगितली प्रेमकहाणी
नेहा म्हणाली, “मी गुजरातमध्ये शिकले. मी कॉन्व्हेंट शाळेत होते. तर आमच्या सिस्टर्स केरळामधील होत्या. माझे बरेच शिक्षक मल्याळी होते. क्वीन ऑफ एंजल्स कॉन्व्हेंट नावाची आमची शाळा होती. आम्ही भरुचमध्ये राहायचो. माझ्या शाळेच्या मुख्याधिकांपासून ते प्राध्यापिकांपर्यंत सगळे मल्याळी. माझी सर्वात चांगली मैत्रीण होती, ती मल्याळी. माझे जास्तीत जास्त मित्र-मैत्रीणी हे दाक्षिणात्य होते. त्यामुळे त्यांचा प्रभाव माझ्यावर नेहमी होतं होता.”
पुढे चिन्मयची पत्नी म्हणाली, “मला लॉकडाऊनमध्ये चिन्मयने सांगितलं की, नेहा तू ‘कुंबलंगी नाइट्स’ चित्रपट बघ आणि मी बघितला. मी पहिल्यांदा पाहिलेला तो मल्याळम चित्रपट होता. ‘कुंबलंगी नाइट्स’नंतर मी लॉकडाऊनमध्ये अनेक मल्याळम चित्रपट बघितले. त्यानंतर मला असं झालं की, आपण या मल्याळम संस्कृतीबद्दल अधिक जाणून घेऊया. मग मी त्यासंदर्भात भरपूर पुस्तकं मागवली. ती वाचू लागले. त्यानंतर मला एक व्यक्ती सापडली, जी कोट्टायममध्ये राहते. ते माझे आठवड्यातून तीनदा ४०-४५ मिनिटं क्लास घ्यायचे. मग त्यांनी मला बोलायला शिकवलं. व्याकरण शिकवलं. मी लिहायला वाचायला स्वतःच्या स्वतः शिकले. हे गेल्या २०२०-२४मध्ये सगळं घडलं आहे. मी जेव्हा केरळ राज्याबद्दल शोधायला सुरुवात केली तेव्हा मला तिथल्या लोकांची धारणा समजली. अलेप्पी, कोची यांच्याबद्दल खूप जास्त माहिती मिळाली. मला केरळ इतकी कोकणाची आठवण करून देतं. मराठी माणूस तिथे रमेल इतकं केरळकडे आहे.”
“आता आमच्याकडे जेवणं जे बनतं ते पण केरळच्या पद्धतीत असतं. माझे मसाले, केसांना लावायचं तेल, चेहऱ्याचं तेल, भात वगैरे सगळं केरळहून येतं. मुलांना, चिन्मयला खूप आवडतं. जहांगीर केरळचं जेवण असेल तर तुटून पडतो, त्याला इतकं आवडतं,” असं नेहाने सांगितलं.