मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणून सर्वांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला ओळखले जाते. तिने तिच्या अभिनय कौशल्याच्या जोरावर आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. सोनाली कुलकर्णी आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. नुकतंच प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक फुलवा खामकरने तिच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.
सोनाली कुलकर्णी आणि प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक फुलवा खामकर या एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. त्या दोघीही कायमच चर्चेत असतात. नुकतंच फुलवाने त्या दोघींचा एक गोड फोटो पोस्ट केला आहे. त्याला कॅप्शन देताना तिने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याबरोबर तिने तिच्या आणि सोनालीच्या पहिल्या भेटीचा किस्साही सांगितला आहे.
आणखी वाचा : “…आणि आजही मी त्यावर ठाम”, अमृता खानविलकरने सोनाली कुलकर्णीबद्दल मांडलेले थेट मत, म्हणालेली “आम्ही मैत्रिणी…”
फुलवा खामकर पोस्ट
“सोनाली, तुला वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा !
सोनाली आपण २००८ मध्ये जेव्हा भेटलो तेव्हापासून तू आहेस तशीच आहेस! एक माणूस म्हणून या यशाचा,कीर्तीचा कोणताही परिणाम तुझ्यावर झालेला नाही आणि मला ते खूप महत्वाचं वाटतं…
मला ‘ स् सासुचा ‘ या माझ्या पहिल्या चित्रपटाच्या गाण्याच्या चित्रीकरणा चा पहिला दिवस आठवतो… मी खूप घाबरलेली होते..मला काहीच माहीत नव्हतं, सेट वर काय असतं, कसं असतं वगैरे….कधीच कोणाला असिस्ट नव्हतं न केलं…फक्त घरचा अभ्यास करून गेले होते, कोणी मदतीला सुद्धा नव्हतं! इतक्यात मला फुलवा ताई म्हणून जोरात हाक मारत एक अत्यंत सुंदर, गोड २० वर्षांची मुलगी धावत आली आणि तिने मला गच्च मिठी मारली आणि म्हणाली की ती माझी बुगी वुगी पासून फॅन आहे आणि तिला मला पाहून खूप आनंद झाला आहे… माझ्या बरोबर काम करायला मिळणार म्हणून!!! बास्स त्यावेळी तुझ्या या एका वाक्याने मला खूप आत्मविश्वास मिळाला होता सोनाली !!…
पुढे आपल्या दोघींच्या आयुष्यात खूप काही घडलं,कीर्ती, पैसा, प्रेक्षकांचं प्रेम सगळं सगळं आलं , पण आजही आपलं नातं आहे तसंच आहे…तू आहे तशीच आहेस… आणि ते सर्वांना नाही ग जमत….आजही आपल्यात काही बे बनाव झाला आपली मतं नाही जुळली की आपण खूप भांडतो ,खूप काही बोलतो, आपली मतं परखडपणे मांडतो मात्र एकमेकींना धरून राहतो…. हेच आयुष्यात खूप महत्त्वाचं आहे नाही का ग? बाकी सगळं येत जात असतं नाही का??
सोनाली अशीच रहा..खूप आनंदी रहा…खूप छान काम कर…तुला माझे खूप खूप आशीर्वाद आणि खूप खूप खूप प्रेम!!!’, असे फुलवाने म्हटले आहे.
दरम्यान फुलवाच्या या पोस्टवर सोनालीही कमेंट केली आहे. सोनालीने या पोस्टवर कमेंट करताना ‘आय लव्ह यू’ असे लिहिले आहे. त्याबरोबर तिने हार्ट इमोजीही शेअर केला आहे.