Maharashtra Bhushan Award: मराठी सिने व नाट्यसृष्टी गाजवलेलं अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारने काल (२२ फेब्रुवारी) गौरविण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि इतर उपस्थित मान्यवारांच्या हस्ते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. यावेळी अशोक सराफ यांच्यासह पत्नी निवेदिता सराफ उपस्थित होत्या. अशोक सराफ म्हणजे मराठी मातीतला अस्सल हिरा, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं. त्यावेळेस ते म्हणाले, “सर्व पुरस्कारप्राप्त गौरवमूर्तींचं मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. अष्टपैलू हा शब्द ज्यांना लागू होतो ते म्हणजे अशोक सराफ खऱ्या अर्थाने त्यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे. महाराष्ट्र भूषण हा राज्याचा सर्वोत्तम पुरस्कार आज त्यांना प्राप्त होतोय. त्यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. सलग पन्नास वर्ष असंख्य भूमिका करून देखील, ज्यांच्या अभिनयाची आणि नवं काहीतरी करून दाखवण्याची भूक आजही कायम आहे. मगाशी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ७५ वर्ष झाली तरी सुद्धा ते अजूनही अगदी त्यांची उमेद कायम आहे. खरं म्हणजे मराठी मातीतला अस्सल हिरा असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मराठी मातीला आणि मराठी माणसाला तुमचा सार्थ अभिमान आहे.”

हेही वाचा – “मराठी चित्रपटाचा चेहरा…”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून महाराष्ट्र भूषण अशोक सराफांवर स्तुतीसुमने, म्हणाले…

अवघ्या महाराष्ट्रासाठी हा केवळ अभिमानाचा नाही तर….

पुढे मुख्यमंत्री म्हणाले, “खरं म्हणजे त्यांच्या अमृतमहोत्सव साजरा करताना महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना देण्यात येतोय. हे त्यांच्यासाठी आणि आपल्या सरकारसाठी देखील अभिमानाची व गौरविण्याची बाब आहे. शिवाय आपल्या सिनेसृष्टीसाठी आनंदाची बाब आहे. अवघ्या महाराष्ट्रासाठी हा केवळ अभिमानाचा नाही तर अमृताहूनी गोड क्षण आजचा दिवस आहे असं म्हटलं वावगं ठरणार नाही. मी पुन्हा महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या गौरवशाली कारकिर्दीला मनापासून शुभेच्छा देतो. गेल्यावर्षी ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले, ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देखील महाराष्ट्र भूषण पुरस्कार आपल्या सरकारने प्रदान केला. त्यावेळी देखील आम्हाला पुरस्कार देण्याची संधी आणि सौभाग्य आम्हाला प्राप्त झालं. खरं म्हणजे आज तीन वर्षांचे पुरस्कार सलग एकाच वेळी देतोय. सुधीर मुनगंटीवार यांनी सगळा बॅकलॉक भरून काढला आहे. हे सगळे पुरस्कार प्रदान करण्यासाठी आम्हाला सरकार स्थापन करावं लागलं. आणि अनेक पुरस्कार असतील अनेक या राज्यामधली शिल्लक राहिलेली काम आम्हाला करण्याची संधी देखील मिळाली. खरं म्हणजे अशोक सराफ यांचं आडनाव सराफ असलं तरी त्यांची दागिण्यांची पेढी वगैरे काही नाहीये. मात्र त्यांनी त्यांच्या अभिनयाने मराठी रसिक मनावर सोने, चांदी आणि मोत्यांची अक्षरशः उधळणं केलेली आहे. आधी नाटक, मग चित्रपट, त्यानंतर कालांतराने टीव्ही अवतरलेले अशोक सराफ यांनी स्वतःची मर्यादा आणि सामर्थ्य अचूक ओळखून आपली कारकिर्द पद्धशीरपणे बांधली. खऱ्या अर्थाने तिन्ही माध्यमातील त्यांच्या अविस्मरणीय भूमिकांनी प्रेक्षकांची देखील अभिरुची संपन्न केली. अशोक सराफ यांनी संपूर्ण महाराष्ट्राला पोट धरून हसवलं. त्यांच्या अभिनयाने आपलं जगणं सुसहय्य देखील केलं. म्हणून आज त्यांचा सन्मान करून थोडीशी त्यांचा कार्याची किंबहूना त्यांची परतफेड करण्याचा आमचा थोडासा ऋृणातून उतराई होण्याचा प्रयत्न केला आहे.”

हेही वाचा – महाराष्ट्र भूषण स्वीकारल्यानंतर अशोक सराफ यांनी व्यक्त केल्या भावना; म्हणाले, “तुमचे हे उपकार…”

या पुरस्कारात निवेदिता सराफ यांचा देखील वाटा – मुख्यमंत्री

“प्रसिद्धचं इतकं वलय मिळून देखी त्यांनी आपलं जमिनीशी नातं तोडलेलं नाही. जी जमिनीशी आणि मराठी माणसाची नाळ त्यांनी जोडली आहे, ती अखंडपणे कायम ठेवण्याचं त्यांनी काम केलं. अत्यंत शांत स्वभावाने चित्रपट नव्हे तर मराठी रंगमंच गाजवलं. हिंदीतील पहिला सुपरस्टार यांच्यासह रुपेरी पडदा गाजवला. आणि मन मात्र रमलं मराठी मातीमध्येच, हे याठिकाणी आवर्जुन सांगू इच्छितो. मराठी रसिकांनी अशोक भाऊंना भरभरून प्रेम दिलं. हे देखील आपण सगळे जाणतो. आज त्यांचा महाराष्ट्र भूषण म्हणून सत्कार होतोय. हा पुरस्कार मिळत असला तरी त्यांच्यातला साधा माणूस निरागस चेहरा महाराष्ट्रासाठी कायम भूषावत राहिलं, असं देखील याठिकाणी सांगतो. यश, पैसा, प्रसिद्धी सगळं मिळाल्यावर देखील त्यांच्यातील माणूसकी केवळ शिल्लक नाही तर जागी ठेवली आहे, हे मी याठिकाणी सांगू इच्छितो. खरं म्हणजे रंगमंचाच्या मागे काम करणाऱ्या विस्मृतीत गेलेल्या काही निवडक कलावंताना सुद्धा त्यांनी आवश्यकतेनुसार मदत केली. हा देखील स्वभाव नक्की त्यांचा भावुन जाणारा आहे. त्यांना हा पुरस्कार देऊन महाराष्ट्र शासनाने या पुरस्कारची उंची वाढवलेली आहे. त्यांच्या या पुरस्कारात बेटरहाफ म्हणजेच अभिनेत्री निवेदिता सराफ यांचा देखील वाटा आहे. यशस्वी पुरुषाच्या मागे कोणाचा हात असतो हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. म्हणून मी त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. अशोक सराफ यांची हीच उर्जा त्यांच्या शंभरीपर्यंत कायम मिळत राहतो, अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि पुन्हा त्यांचं मनापासून अभिनंदन करतो,” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde appreciated to ashok saraf in maharashtra bhushan award ceremony pps