प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या आगामी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या ऐतिहासिक चित्रपटाची सध्या सातत्याने चर्चा सुरु आहे. नुकताच या चित्रपटाचा शुभारंभ सोहळा मुंबईत पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या सोहळ्याला उपस्थिती दर्शविली. यावेळी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्याच्या फर्स्ट लूकची झलकही काल प्रदर्शित करण्यात आली. त्याबरोबर इतर कलाकारांचेही लूक रिव्हील करण्यात आले.
या चित्रपटातील कलाकारांचे लूक रिव्हील होत असताना या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. या त्यांनी महेश मांजरेकरांचे कौतुक केले. तसेच या चित्रपटालाही फार मनापासून शुभेच्छा दिल्या. “हा चित्रपट नक्कीच सुपरहिट होईल. याची सुरुवातच जबरदस्त आहे. वेडात मराठे वीर दौडले सात या मराठी चित्रपटाचा शुभारंभ आज इथे होतोय. या चित्रपटाला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्याचे अभिनंदन करतो”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
आणखी वाचा : “हा लूक अजून फायनल झालेला नाही…” छत्रपती शिवरायांची भूमिका साकारण्याबद्दल अक्षय कुमारचे जाहीर वक्तव्य
“महाराष्ट्र म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊनच प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात केली जाते. गेल्या काही काळात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अनेक चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. ते लोकप्रियही होतात.”
“महेश मांजरेकरांनी आपल्यासमोर हा चित्रपट आणण्याचा प्रयत्न केला आहे. महेश मांजरेकरांचा ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘काकस्पर्श’ आणि ‘बिग बॉसही’… तसं सर्व बघायला गेलं तर तुम्हीच यात दबंग आहेत. अनेक अडचणींवर मात करत महेश मांजरेकरांनी मोठं यश मिळवलं आहे. त्यांना मी आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो. या चित्रपटात वीर मराठेही आहेत आणि वेडही आहे”, असेही एकनाथ शिंदेंनी म्हटले.
आणखी वाचा : “कोणीतरी आपल्याला जा म्हणण्यापेक्षा…” पॅडी कांबळेने सांगितले ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडण्यामागचे कारण
दरम्यान ‘वेडात मराठी वीर दौडले सात’ हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे प्रतापराव गुजर यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. तर बिग बॉस फेम उत्कर्ष शिंदे, जय दुधाणे, विशाल निकम आणि तुझ्यात जीव रंगला अभिनेता हार्दिक जोशीही चित्रपटात झळकणार आहे.