आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर’ हा चित्रपट खूप गाजल्याचे पाहायला मिळाले. आता या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच ‘धर्मवीर २’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित आणि मंगेश देसाई निर्मित ‘धर्मवीर २’ आता २७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. आता या चित्रपटाच्या निमित्ताने निर्माते मंगेश देसाई यांनी ‘बोल भिडू’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरची पहिली भेट
अभिनेत्री निर्मिती सावंत यांनी निर्माते मंगेश देसाई यांची ‘बोल भिडू’ या यूट्यूब चॅनेलसाठी मुलाखत घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी बोलताना मंगेश देसाई म्हणाले, “२००८ साली एका कार्यक्रमाच्या निमित्ताने माझी आणि साहेबांची पहिल्यांदा भेट झाली होती. मला वाटतं तेव्हा साहेब सभागृहनेते होते. त्यानंतर कधीतरी अशी भेट व्हायची. ते प्रचंड अबोल आहेत. कसे आहात, नमस्ते एवढंच ते बोलयाचे. पण, हळूहळू मला वाटायला लागलं की, त्यांना भेटूया, त्यांच्याजवळ बसूया. मग कधीतरी मी त्यांच्या किसननगरच्या शाखेत जायचो. त्यांना कलाकारांबद्दल प्रचंड प्रेम आहे. ते सिनेमा, नाटक बघायचे. ती इतकी जवळीक निर्माण झाली की ,हळूहळू त्यांच्या घरी माझं येणं-जाणं सुरू झालं. लतावहिनींबरोबर गप्पा व्हायच्या. श्रीकांत तेव्हा खूप छोटा होता; आता ते खासदार आहेत.”
“मला असं वाटतं ना की, एकनाथ शिंदेसाहेब हा माणसाशी माणसाप्रमाणे वागणारा माणूस आहे. त्यांच्याकडे बघितल्यानंतर किंवा त्यांच्याजवळ गेल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की, मोठं हृदय नाही; पण १०० हृदयं अन् एक शरीर असलेला माणूस कोण आहे, तर आपले माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब. त्यांच्याकडे ‘नाही’ हा शब्दच नाही.”
पुढे बोलताना ते म्हणतात, “मी त्यांना एक पोर्टेट गिफ्ट म्हणून द्यायला गेलो होतो. ते पोर्टेट त्यांनी घेतलं. आता ते माझ्यापेक्षा वयानं मोठे असल्यानं मी त्यांना नमस्कार करायला गेलो. ते म्हणाले, नमस्कार नाही करायचा. आपण मित्र आहोत आणि तुम्ही कलाकार आहात हे लक्षात घ्या. नमस्कार नाही करायचा, पाया पडायचं नाही. त्यांना प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे. त्यांना माणूस कळतो; पण ते रिअॅक्ट होत नाहीत. त्यांच्यापुढे शत्रू जरी गेला तरी ते त्याला मदत करतात आणि जाती-पातीचं राजकारण न करणारा माणूस आहे. फक्त काम करणारा माणूस आहे.
“आता साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना किती वेळा तरी बोललो की, एवढी धावपळ नका करू. काळजी घ्या. त्यावर ते म्हणाले, “प्रकृतीची काळजी आता घेतली, तर महाराष्ट्राची काळजी घेता येणार नाही. मंगेश मला २४ तास नाही, २८ तास मिळाले तरी काम करणार.” आज तो माणूस फक्त दोन-तीन तास झोपतो.”
“त्यांनी प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे…”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोणती गोष्ट बदलली पाहिजे, असं तुला वाटतं, असा निर्मिती सावंत यांनी प्रश्न विचारल्यावर मंगेश देसाई म्हणाले, “आता ते मुख्यमंत्री झालेत, तर त्यांनी दिनचर्या बदलली पाहिजे. त्यांनी खरंच स्वत:च्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. त्यांनी त्यांचं वेळापत्रक बांधून घेतलं पाहिजे. लोक येतंच राहणार आहेत. कारण- ते सगळ्यांना मदत करतात.”
दरम्यान, ‘धर्मवीर २’ हा मराठी चित्रपट २७ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपट ९ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता; पण त्यावेळी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली होती. पूरस्थितीमुळे या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते. प्रसाद ओक हा आनंद दिघेंच्या आणि क्षितीश दाते हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भूमिकेत दिसणार आहे.