दिग्दर्शक केदार शिंदे यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर सिनेसृष्टीसह राजकीय नेतेमंडळींकडून विविध प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहेत. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी नुकतंच हा चित्रपट कसा वाटला याबद्दल पोस्ट शेअर केली आहे.
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी नुकतंच फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी फेसबुकवर चित्रपटाचे पोस्टर पोस्ट केले आहे. त्याबरोबर त्यांनी शाहीर कृष्णराव साबळे यांच्या काही आठवणीही सांगितल्या आहेत.
आणखी वाचा : “हा माझा पहिला चित्रपट आणि तिचा प्रतिसाद…” सना शिंदेच्या पोस्टने वेधलं लक्ष
बाळासाहेब थोरात यांची पोस्ट
शाहीर कृष्णराव साबळे यांच्या जीवनावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा सिनेमा नुकताच बघितला. केदार शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे या उत्तम कलाकृतीसाठी मनापासून अभिनंदन. अंकुश चौधरी यांनी आपल्या कसदार अभियानातून शाहीर साबळे यांची व्यक्तिरेखा जिवंत केली आहे. सना शिंदेने साकारलेली भानुमती आणि अन्य कलाकारांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा स्मरणात राहतात. अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेली गाणी अख्खा महाराष्ट्र गुणगुणतोय. हा सिनेमा बघताना इतिहासाचा एक कालखंड नजरेसमोर उभा झाला. अनेक चळवळींच्या आठवणी ताज्या झाल्या, त्या काळातले राजकारण, समाजकारण, साहित्य आणि संस्कृती पुन्हा एकदा अनुभवता आली.
स्वातंत्र्य चळवळीच्या अखेरच्या टप्प्यात समाजवादी विचारांनी प्रेरित झालेली एक मोठी पिढी महाराष्ट्रात निर्माण झाली. शाहीर साबळे, अण्णाभाऊ साठे, अमर शेख, आत्माराम पाटील, शाहीर जैनु शेख, गव्हाणकर, शाहीर जंगम, केशरताई जगताप अशी ही मोठी परंपरा आहे. त्या तरुण पिढीचे आदर्श महात्मा गांधी होते आणि कार्ल मार्क्स सुद्धा. हे निव्वळ शाहीर नव्हते तर त्यांना पुरोगामी विचारांची बैठक होती. ते समाजकारणी, समाजसुधारक होते, म्हणून त्यांच्या काव्याचे सादरीकरण हे नेत्यांच्या भाषणाइतकेच प्रभावी असायचे. शाहीर साबळे यांच्या व्यक्तिमत्वाला तर साक्षात साने गुरुजींचा स्पर्श झालेला होता.
1942 ची स्वातंत्र्य चळवळ, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, जातीभेद निर्मूलनासाठी सुरू झालेल्या चळवळी या सर्वांमध्ये शाहीर साबळे यांचा सक्रिय सहभाग होता. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा यासाठी साने गुरुजींनी जो संघर्ष सुरू केला, त्याला साथ म्हणून शाहीर साबळे यांनी आपल्या स्वतःच्या गावात पसरणी येथे भैरवनाथ मंदिरात अस्पृश्यांचा मंदिर प्रवेशाचा कार्यक्रम केला. या कार्यक्रमाला साने गुरुजी, सेनापती बापट, कर्मवीर भाऊराव पाटील हे स्वतः उपस्थित होते.
माझ्या विद्यालयीन काळात मी संगमनेरला अमर शेख, शाहीर साबळे यांना ऐकले आहे. माझे कुटुंब पुरोगामी विचारांचे असल्यामुळे सुरुवातीपासूनच या मंडळींसोबत वैचारिक नाळ जुळलेली होती. या व्यक्तिमत्त्वांच्याबद्दल माझ्या मनात कायम जिव्हाळ्याची भावना राहिली.
अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये किंवा मंचावर शाहीर साबळे यांना मी बघत आलो. एक प्रसंग आजही माझ्या डोळ्यासमोर जिवंत आहे. 1990 सालच्या दरम्यानची ही घटना आहे. आकाशवाणी आमदार निवासातल्या कॅन्टीन मधली. बहुतांश आमदार मंडळी तेव्हा कॅन्टीन मध्येच जेवायची. आमदारांना बसण्यासाठी कॅन्टीनमध्ये स्वतंत्र विभागही तयार करण्यात आलेला होता. त्या दिवशी माझ्या लक्षात आलं की शाहीर साबळे सुद्धा कॅन्टीनमध्ये आले आहे. ते बसायला जागाच शोधत होते. मी शाहिरांना आवाज दिला, त्या दिवशी आम्ही एकत्र जेवण केलं. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीवर आम्ही त्या दिवशी गप्पा मारल्या. शाहीर साबळे यांच्या मनात पुरोगामी विचारांबद्दल असलेली आस्था त्या दिवशी मी अत्यंत जवळून अनुभवली. आज त्यांचा चरित्रपट बघताना आनंद वाटत होता.
शाहीर साबळे आणि समकालीन अनेक थोर व्यक्तिमत्त्वांचा महाराष्ट्राच्या निर्मितीत आणि उभारणीत मोलाचा वाटा आहे. जाती धर्माच्या भिंती पाडून हा राकट आणि कणखर महाराष्ट्र या थोर व्यक्तींनी उभा केला. स्वातंत्र्याची चळवळ, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, सामाजिक सुधारणांच्या चळवळी यांचा धगधगता इतिहास अनुभवायचा असेल तर महाराष्ट्र शाहीर हा सिनेमा अवश्य बघायला हवा. सहकुटुंब बघावी अशी ही अस्सल कलाकृती आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.
आणखी वाचा : Video : ‘बहरला हा मधुमास’ गाण्यावर प्राजक्ता माळीच्या भाचीने ठरला ठेका, म्हणाली “नाच येत नसेल…”
दरम्यान ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटात सना शिंदे, अभिनेत्री अश्विनी महांगडे, निर्मिती सावंत यांसह अनेक कलाकार हे महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या संगीताची धुरा अजय-अतुल यांनी सांभाळली आहे. शुक्रवारी २८ एप्रिल २०२३ रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला.