अभिनेत्री व नृत्यांगना माधुरी पवार सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिच्या अभिनयाचे व डान्सचे लाखो चाहते आहेत. मराठी इंडस्ट्रीत काम करत असली तरी माधुरी साताऱ्यातच राहते, ती साताऱ्यातच जन्मली व मोठी झाली. तिचे वडील घरांचं बांधकाम करायचे, त्यामुळे त्यांना काम मिळेल तिथे फिरावं लागायचं. शिक्षण घेता यावं म्हणून त्यांनी माधुरीला तिच्या आजीजवळ ठेवलं होतं. ती आजीसोबत पत्र्याच्या झोपडीत राहायची. त्याच घरात राहून तिने शिक्षण पूर्ण केलं आणि तिची डान्स व अभिनयाची आवड जपत करिअर केलं. माधुरीचा संघर्ष भारावून टाकणारा आहे.
बरीच वर्षे इंडस्ट्रीमध्ये काम करत असली तरी माधुरी अजूनही भाड्याच्या घरात राहते. माधुरीचं स्वप्नातलं घर कसं आहे, याबद्दल तिने ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. “मी माझ्या आई-बाबांसाठी एक छोटसं साजेसं घर घेतलं आहे. पण माझं ड्रीम हाऊस वेगळंच आहे. मला खूप मोठं नाही, पण चार खोल्यांचं घर असावं असं वाटतं. त्यात स्वयंपाकघर, हॉल, माझी खोली आणि एक पाहुण्यांसाठी खोली असेल. मला कौलारू घरं खूप आवडतात. कोकणातील घरांसारखं घर मला हवं आहे. माझ्या घरात कोणत्याच सुखसोईंचा अभाव नसावा. बाहेरून साधं वाटत असलं तरी घरात आल्यावर सर्व सोई-सुविधा उपलब्ध असाव्या,” अशी इच्छा माधुरीने व्यक्त केली.
बालकलाकार साईशा भोईरच्या आईचे दागिने अन् मालमत्ता जप्त होणार; बँक खात्यात आढळले कोट्यवधी रुपये
पुढे ती म्हणाली, “माझ्या घराभोवती झाडं असावी, प्राणी असावे. मला सातारा खूप आवडतं, त्यामुळे मी इथेच घर बांधेन. याशिवाय मला कोकण फार आवडतं. शाळेत असताना आपण उगवता सूर्य, टेकडी, एक नदी आणि तिथे असलेल्या घराचं चित्र काढायचो, अगदी तसंच माझ्या स्वप्नातलं घर आहे.”
दरम्यान, माधुरी पवारने ‘रानबाजार’ या मराठी वेब सीरिजमध्ये प्रेरणा पाटील नावाची भूमिका साकारली होती. याशिवाय तिने ‘देव माणूस’ व ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकांमध्ये भूमिका केल्या होत्या. ती उत्तम नृत्यांगना असून तिच्या डान्ससाठीही ओळखली जाते.