गेल्या वर्षी २४ ऑगस्टला सुप्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव यांचं निधन झालं. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील सोज्ज्वळ अभिनेत्री अशी ओळख असलेल्या सीमा देव यांची अल्झायमर्स या आजारामुळे प्राणज्योत मालवली. वयाच्या ८१व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रमेश देव आणि सीमा देव यांची जोडी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक जोडी होती. अलीकडेच रमेश आणि सीमा देव यांची धाकटी सून स्मिता देव यांनी एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी स्मिता देव यांनी आपल्या सासूबाईंच्या आठवणींना उजाळा दिला. तसंच सीमा देव यांनी अभिनय क्षेत्र का सोडलं? याविषयी देखील स्मिता देव यांनी सांगितलं.
स्मिता देव यांनी कांचन अधिकारी यांच्या ‘बातों बातो में’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी कांचन अधिकारी म्हणाल्या की, रमेश देव यांच्या तुलनेत सीमा ताईंनी खूप लवकर अभिनय करणं सोडून दिलं. मला कित्येकदा रमेशजी जुहूच्या क्लबमध्ये भेटायचे तेव्हा ते म्हणायचे, ती का काम करतं नाही, मी तिला म्हणतोय, रेखा कामत पण अजून काम करतायत तू कर. तेव्हा स्मिता देव यांनी या मागचं कारण सांगितलं.
हेही वाचा – सई ताम्हणकरला आवडला ‘बिग बॉस मराठी’तील ‘या’ सदस्याचा स्वभाव, निक्की तांबोळीचा उल्लेख करत म्हणाली…
स्मिता देव म्हणाल्या, “ती खूप तरुण वयापासून काम करत होती. नाटकाचे दौरे, चित्रपटाचं शूट करायची. एकदा असं झालं की, एका चित्रपटासाठी तिने एक महिना सलग काम केलं आणि जेव्हा ती चित्रपटाच्या प्रीमियरला गेली. मी ती असं म्हणते कारण ती माझी आई आहे. तर तिला प्रीमियरला गेल्यावर लक्षात आलं ती फक्त एका लाँग शॉर्टमध्ये आहे. तेव्हा ती खूप दुखावली. कारण ती म्हणाली, मी एवढं जीव ओतून काम केल्यानंतर जर एवढंच असणार असेल. तर मी काम करणार नाही. त्यामुळे तिने काम करणं सोडून दिलं.”
पुढे स्मिता देव म्हणाल्या, “अभिनय क्षेत्रातील काम सोडल्यानंतर अजिंक्यला मुलगा झाला आणि मग ती त्याच्याबरोबर वेळ घालवू लागली. मग मी आले. त्यानंतर आईला शॉपिंगला, भाजी आणायला घेऊ जायला लागले. आमच्या दोघींचं स्वयंपाक, शॉपिंगमध्ये करताना फार एकमत असायचं. तिला स्वयंपाक बनवायची खूप आवड होती. ती अजिंक्य आणि अभिनयचा बर्थडे केक स्वतः घरी करायची.”
“तिला जेवण करण्याची खूप हौस होती. ते परफेक्ट गृहिणी म्हणतात ना ती होती. सगळे नाटकाचे दौरे, आणि चित्रपटाचं शूटिंग करून ती सांभाळायची. तिला शिक्षिका व्हायचं होतं,” असं स्मिता देव यांनी सासूबाई सीमा देव यांच्याबद्दल सांगितलं.