‘आयफा – २०२३’ हा पुरस्कार सोहळा नुकताच रंगला. या पुरस्कार सोहळ्याला बॉलीवूडमधील अनेक नामवंत कलाकारांनी हजेरी लावली होती. या पुरस्कार सोहळ्यात मराठीचा डंका वाजलेला दिसला. याचं कारण म्हणजे रितेश देशमुखच्या ‘वेड’ या चित्रपटाला या पुरस्कार सोहळ्यात विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. आता त्यांचे मित्रमंडळी व चाहते त्यांचं अभिनंदन करत आहेत. अशातच रितेश-जिनिलीयाच्या वहिनीने या विशेष कामगिरीबद्दल त्यांचा एक खास फोटो शेअर करत अभिनंदन केलं.
‘वेड’ हा चित्रपट गेल्या वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या माध्यमातून रितेश देशमुखने दिग्दर्शनात पाऊल टाकलं, तर त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलीया देशमुख हिने मराठी सिनेसृष्टीत अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं. या चित्रपटाने चित्रपटगृहात उत्कृष्ट कामगिरी केली. याच कामगिरीबद्दल यंदाच्या आयफा पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाला प्रादेशिक चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार मिळाला.
‘वेड’ या चित्रपटाला हा पुरस्कार मिळतात सर्वत्र रितेश-जिनिलीयावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. रितेश-जिनिलीयाची वहिनी दीपशिखा देशमुखने त्या दोघांचा पुरस्कार घेतानाचा एक फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत लिहिलं, “अभिनंदन दादा-वहिनी…” तर यावर दीपशिखाची जाऊ म्हणजेच जिनिलीयानेही खास शब्दात उत्तर दिलं. जिनिलीयाने दीपशिखाची स्टोरी रिपोस्ट करत लिहिलं, “थँक यू हनी!” याचबरोबर हिरव्या रंगाचा एक हार्ट इमोजी दिला.
आता या देशमुखांच्या दोन जावांमध्ये असलेलं बॉण्डिंग चर्चेत आलं आहे. जिनिलीयाने दीपशिखाला दिलेल्या या उत्तराने सर्वांचंच लक्ष वेधलं आहे. आत्ता पहिल्यांदाच नाही, तर ‘वेड’ चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा या चित्रपटाला मिळालेल्या यशाबद्दल देखील दीपशिखाने एक पोस्ट शेअर करत त्या दोघांचं अभिनंदन केलं होतं.