Maharashtra Bhushan Award: अशोक सराफ म्हणजे मराठी रसिक प्रेक्षकांसाठी आनंदाची पर्वणी आहे. गेल्या ४ दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर ते अधिराज्य गाजवत आहेत. कधी विनोदी, कधी गंभीर, तर कधी खलनायक अशा विविधांगी भूमिका साकारून अशोक सराफ अविरत प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. त्यामुळे सिनेसृष्टीत त्यांचं नाव अत्यंत अदबीने घेतलं जातं. आज अशोक सराफ यांना महाराष्ट्राचा सर्वोच्च पुरस्कार महाराष्ट्र भूषण प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, दीपक केसरकर यांच्या हस्ते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला गेला. त्यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करताना अशोक सराफांवर स्तुतीसुमने उधळली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सर्वच उपस्थितीत मान्यवर आणि भगिनी, बंधूनो, खरं म्हणजे कार्यक्रम पत्रिका ज्यावेळेस मी बघितली, त्यावेळेस मला बोलण्याकरता ४ मिनिटं देण्यात आली आहेत. आता माझ्या समोर प्रश्न आहे, ४ मिनिटांमध्ये इतके महान लोक समोर बसले आहेत; त्या प्रत्येकाबद्दल बोलायचं झालं तर १७ सेकंदाच एका व्यक्तीबद्दल बोलायला लागेल. आता अशोक मामांबद्दल १७ सेकंदात बोलायचं, सुरेश वाडकरांबद्दल १७ सेकंदात बोलायचं, अरुणा इरानींबद्दल १७ सेकंदात बोलायचं म्हणजे मला असं वाटतं, मलाच एखादा जीवनगौरव पुरस्कार मिळेल, जर मी त्यांच्याबद्दल १७ सेकंदात बोलू शकलो. पण असं वाटतं की, आपल्या सगळ्यांकरिता आजचा दिवस अत्यंत आनंदाचा दिवस आहे. मी यासाठी सुधीर मुनगंटीवार यांचे मनापासून आभार मानेन. कारण सुधीर भाऊ आणि मी दोघंही विदर्भातून येतो. त्यामुळे बॅकलॉक तयार झाला की काय होतं हे आम्हाला माहित आहे. त्यामुळेच सुधीर भाऊंनी बॅकलॉक पूर्ण करत मागील तीन वर्षांचे सगळे पुरस्कार हे आज प्रदान करण्याचा कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल मी त्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो.”

हेही वाचा – अशोक सराफ : रसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या ‘विनोदाच्या सम्राटा’ला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण

पुढे उपमुख्यमंत्री म्हणाले, “खरंतर म्हणजे ज्या ज्या लोकांना याठिकाणी पुरस्कार मिळाले आहेत, हे अतिशय मोठी मंडळी आहेत. आज खरंतर अशोक मामांना पुरस्कार मिळणार आहे. सुरेश वाडकर यांना पुरस्कार आहे, उषाताई चव्हाण, उषाताई नाईक, गजेंद्र अहिरे, नागराज मुंजळे, अरुणा इरानी, आमचे मिथुन दा, हेलनजी, सोनू निगम ही सगळी नावं बघितली तर, संपूर्ण सिनेसृष्टीला आणि आपल्या जीवनालाही समुद्ध करणारे सर्व लोक याठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांना आपण पुरस्कार देतोय. “

हा नायका स्वप्नातला नाही तर… “

“विशेषतः मला असं वाटतंय की, अशोक मामा ७५ वर्षांचे झालेत असं वाटत नाही. पण झालेत. अशा या त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षामध्ये महाराष्ट्रातला सर्वोच्च पुरस्कार याठिकाणी मिळतोय, हे आमच्याकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे. अशोक मामा तुम्ही एकदा असे म्हणाला होता, मराठी चित्रपटाला नायकाचा चेहरा नसतो, पण खरं एक गोष्ट सांगितली पाहिजे, मराठी चित्रपटाचा चेहरा कोणी असेल तर ते अशोक मामा सराफ आहेत. हे याठिकाणी आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे. सगळी माध्यम, मराठी सिनेमा असेल, हिंदी सिनेमा असेल, टीव्ही असेल, नाटक असेल असं कुठलंच माध्यम नाही ज्याठिकाणी अशोक मामांनी अधिकारशाही गाजवली नाही आणि लोकांच्या मनावर अधिराज्य केलं नाही. नायकापासून ते खलनायकापर्यंत सगळ्या भूमिका केल्या. पण अशोक मामांचा नायक सगळ्यांना याकरिता भावतो की, प्रत्येकाला असं वाटतं कधीतरी मी असा होऊ शकतो. हा नायका स्वप्नातला नाही तर प्रत्यक्ष जीवनातला नायका अशोक मामांना साकारला. म्हणूनच आज मराठी मनावर फार मोठं अधिराज्य मामांनी केलं. आम्ही तर तुमचे चित्रपट पाहत पाहत मोठे झालो, त्याच्यामुळे खरं म्हणजे तुम्हाला पुरस्कार द्यायचा ही आमच्याकरता अत्यंत आनंदाची गोष्ट आहे,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा – महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी पत्नीसह पोहोचले अशोक सराफ; निवेदिता म्हणाल्या, “माझ्या माहेरचे-सासरचे सगळेजण…”

“सर्व आमच्या कलावंताना ईश्वराने दीर्घ आयुष्य द्यावं…”

“सुरेश वाडकरजी तुम्ही तर आमचे अतिशय आवडते गायक आहात. किती आश्चर्य आहे बघा, आजही सुरेश वाडकर यांच्या हाती माइक दिला तर जो आवाज २५ वर्षांपूर्वी ऐकायला मिळायचा तोच आवाज ऐकायला मिळतो. ही आवाजाची सुरेलता जी त्यांनी ठेवली आहेत, ती खरोखर मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाची आहे. आज खरं म्हणजे अधिक बोलण्याची गरज नाही. मला या गोष्टीचा आनंदा आहे, ज्या लोकांनी आपलं जीवन आनंदमय केलं, ज्या लोकांनी आपलं जीवन समृद्धमय केलं, अशा सर्वांना आज पुरस्कार देण्याची संधी आपल्या सर्वांना मिळाली. या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. मिथून दा याठिकाणी येऊ शकले नाहीत. त्याची तब्येत ठिक नाही. पण त्यांनाही मनःपूर्वक शुभेच्छा देतो. सर्व आमच्या कलावंताना ईश्वराने दीर्घ आयुष्य द्यावं, उत्तम आरोग्य द्यावं आणि अशाच प्रकारे सर्व रसिकांची सेवा त्यांच्या हातून होत राहावी, अशाप्रकारच्या शुभेच्छा देतो. मला या चांगल्या कार्यक्रमामध्ये येता आलं, माझे दोन शब्द संपवतो. जय हिंदी जय महाराष्ट्र,” असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deputy chief minister devendra fadnavis showered praises on maharashtra bhushan ashok sarafa pps