‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ अशी ओळख असणाऱ्या नितीन जयराम गडकरी यांच्या जीवनावर आधारित ‘गडकरी’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता राहुल चोपडा हा केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भूमिका साकारणार आहे. आता या चित्रपटाच्या ट्रेलरवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गडकरी या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नागपूर येथे पार पडला. या सोहळ्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय क्रिकेटर उमेश यादव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चित्रपटाच्या टीमचे कौतुक केले.
आणखी वाचा : “गडकरी कमी अन् फडणवीस जास्त…”, ‘गडकरी’ चित्रपटाच्या ट्रेलरवर चाहते नाराज, म्हणाले “त्यांच्या नावाला…”
“नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर आधारित ‘गडकरी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, ही आपल्या सगळ्यांसाठीच आनंदाची गोष्ट आहे. अभिजीत मजुमदार, दिग्दर्शक अनुराग भुसारी, अक्षय देशमुख आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमने नितीन गडकरींचे आयुष्य आपल्या समोर आणले आहे. त्यामुळे त्यांच्या टीमला आणि कलाकारांना मनापासून धन्यवाद देतो.
एक सुंदर चित्रपट तुम्ही तयार केला. याचा ट्रेलर बघून आमच्या सगळ्यांच्याच मनात हा चित्रपट पाहाण्याची उत्कंठा आहे. नितीन गडकरी यांच्या जीवनातील विविध प्रसंग, त्यांच्या व्यक्तिमत्वाचे कंगोरे हे तीन तासांमध्ये बांधणे कठीण आहे. नितीन गडकरी एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांचे आयुष्य एका भागात दाखवणे शक्य नाही, त्यामुळे माझी इच्छा आहे की याचा दुसरा भागही लवकरच प्रदर्शित व्हावा”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान या ट्रेलरची सुरुवात ‘गडकरी’ ते ‘रोडकरी’ या प्रवासाने होते. बालपण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सेवक, निवडणुकीचा पराभव, जीवघेणा हल्ला, समाजकारण या सर्व पैलूंची झलक यात दाखवण्यात आली आहे. येत्या २७ ॲाक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यात नितीन गडकरी यांची भूमिका राहुल चोपडा यांनी साकारली आहे. तसेच या चित्रपटात ऐश्वर्या डोरले, अभिलाष भुसारी, पुष्पक भट, अभय नवाथे, वेदांत देशमुख, तृप्ती प्रमिला काळकर हे कलाकारही झळकणार आहेत.