कोळी गीतांना प्रेक्षकांची खूप पसंती मिळते. आता कोकणच्या जावयाचं एक नवीन कोळी गीत प्रदर्शित झालं आहे. ‘दर्याचं पाणी’ हे सुंदर कोकणी कोळी गीत आहे. देवमाणूस फेम अभिनेता किरण गायकवाड आणि अभिनेत्री अंकिता राऊत यांची फ्रेश जोडी साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘दर्याचं पाणी’ या कोकणी कोळी गीतात एकत्र झळकली आहे. नुकतंच ‘दर्याचं पाणी’ हे कोकणी कोळी गीत प्रदर्शित झालं आहे.
अलिबागच्या नयनरम्य समुद्र किनारी या गाण्याचं चित्रीकरण झालं आहे. या गाण्याचे निर्माते संदेश गाडेकर आणि सुरेश गाडेकर हे आहेत. गायक रोहित राऊत आणि गायिका सोनाली सोनवणे यांनी हे गाणं गायलं असून श्रद्धा दळवी हिने या गाण्याचे बोल लिहिले आहेत. विजय बुटे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या गाण्याला अमेय मुळे यांनी संगीत दिलं आहे. सध्या हे गाण सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये गेलं आहे.
गायक रोहित राऊत ‘दर्याचं पाणी’ गाण्याविषयी म्हणाला, “मां हे दुसरं कोळी गीत आहे जे माझ्या फार जवळचं आहे. गाणं इतकं कॅची होतं की १५ ते २० मिनिटांत मी हे गाणं गायलं आहे. गाणं फार सुंदर होतं की मी सतत ते गाणं गुणगुणत होतो. प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद या गाण्याला मिळतं आहे. त्यामुळे मी प्रेक्षकांचे मनापासून आभार मानतो.”
किरण गायकवाड गाण्याबद्दल म्हणाला…
कोकणचा जावई म्हणजेच अभिनेता किरण गायकवाड दर्याचं पाणी या गाण्याच्या प्रोसेसविषयी म्हणाला, “माझी खूप आधीपासून इच्छा होती की एकदा तरी कोकणी गीतात काम करायचं. दिग्दर्शक विजय बुटे यांनी जेव्हा या गाण्याची संकल्पना माझ्याजवळ व्यक्त केली. तेव्हा मी फारच उत्सुक होतो. कोळी गेटअप मध्ये नाचताना खूप मज्जा आली. आणि समुद्र म्हणजे माझा आवडता विषय असल्या कारणाने, दिवसभर समुद्र किनारी बागडायला आणि शूटिंग करायला धम्माल आली. विशेष म्हणजे माझ्या कोळी लूकवर सोशल मीडियाद्वारे माझे फॅन्स छान छान कमेंट्स करून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. हे पाहून खूपच आनंद झाला.”

गायिका सोनाली सोनवणे गाण्याच्या रेकॉर्डिंग दरम्यानचा किस्सा शेअर करताना म्हणाली, “खरंतर मी माझ्या करिअरची सुरुवातच कोळी गीतांपासून केली. मी आठवीत असताना ते गाणं रेकॉर्ड केलं होतं आणि तेव्हा आपण सीडी लावून गाणी ऐकायचो. दिलाची राणी हे माझं पहिलंच कोळी गीत जे खूप व्हायरल झालं होतं. आणि आता दर्याचं पाणी हे गीत व्हायरल होताना दिसतंय. प्रेक्षकांचा गाण्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. रेकॉर्डिंगचा किस्सा सांगायचा तर या गाण्यात माझ्या चारच लाईन्स होत्या. पण निर्माते आणि टीमने सांगितलं की अजून फीमेलच्या लाईन्स या गाण्यात असायला हव्या. आणि मग मी ते गाणं संपूर्ण गायलं तेव्हा सगळे म्हणतं होते आता या गाण्याला चार चांद लागले आहेत.”