Dharmaveer 2: १३ मे २०२२ रोजी प्रदर्शित झालेला ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. प्रवीण तरडे दिग्दर्शित या चित्रपटात हरहुन्नरी कलाकार प्रसाद ओक याने शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांची भूमिका चोखपणे साकारली होती. आता याच चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘धर्मवीर २’ (Dharmaveer 2) चित्रपटाची घोषणा निर्मात्यांकडून करण्यात आली होती. या चित्रपटाचा टीझर ७ जुलै रोजी प्रदर्शित झाला. परंतु, टीझर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांना यात एक मोठी चूक दिसून आली. आता याच चुकीबाबत एका मुलाखतीत चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांनी खुलासा केला आहे.
नुकत्याच ‘प्लॅनेट मराठी‘ला दिलेल्या मुलाखतीत मंगेश देसाई यांना मुलाखतदाराने प्रश्न विचारला, “धर्मवीर-२च्या टीझरमधील एक सीन आहे; ज्यात साहेब रेल्वे ट्रॅकवरून येत आहेत. त्यांच्यामागून सगळ्या महिला येत आहेत आणि तितक्यात एका बाजूने एक ट्रेन जाते. ती ट्रेन आजच्या काळातली आहे. परंतु, ही गोष्ट जुनी असल्याने, तेव्हा अशा स्वरूपाची लोकल नव्हती. त्यामुळे असंही बोललं जातंय की, हे शूट खूप घाईघाईत करण्यात आलंय, तर हे खरं आहे का?”
या संदर्भात मंगेश देसाई म्हणाले, “हा सिनेमा अजिबात घाईघाईत शूट केलेला नाही. मला टीझर ७ तारखेलाच प्रदर्शित करायचा होता. काही गोष्टी भावनिक असतात, काही गोष्टी आपण मानतो. तेव्हा मला कोणीतरी सांगितलं की, ७ तारीख तुझ्या टीझरसाठी चांगली आहे आणि मी हे सगळं मानणारा माणूस आहे. मी आस्तिक आहे.”
मंगेश देसाई पुढे म्हणाले, “मी जेव्हा ३ तारखेला टीझर बघितला, तेव्हा टीझरमधल्या खूप काही गोष्टी करायच्याच राहून गेल्या होत्या. तेव्हा मी माझ्या टीमला म्हटलं की, मला ७ तारखेला हा टीझर प्रदर्शित करायचाच आहे आणि त्या गडबडीत तो टीझर प्रदर्शित झाला. पण, यानिमित्तानं मला एक गोष्ट कळली की, मराठी प्रेक्षकवर्ग खूप चोख अन् जाणकार आहे आणि आता मराठी सिनेमाचा प्रेक्षक असाच कुठलाही सिनेमा बघायला जात नाही. त्याचं सगळ्यावर बारीक लक्ष आहे.”
“मी नेटकऱ्यांवर अजिबात नाराज नाही. उलट मी त्यांना धन्यवाद म्हणेन की, तुम्ही माझी ही चूक दाखवून दिली आणि ती चूक तुम्हाला सिनेमात सुधारलेली दिसेल. टीझर प्रदर्शित झाल्यावर मी लगेच टीमला सांगितलं की, अरे, एवढी मोठी चूक तुमच्या लक्षात कशी नाही आली. माझ्या टीमनं माझी माफीदेखील मागितली. पण, माझी टीम म्हणाली की, दादा चित्रपटात हे बदललेलं असेल. आम्ही ते बदल करतो आहोत आणि यानिमित्तानं मी खरंच नेटकऱ्यांचे आभार मानेन. कारण- ती चूक आता आम्ही १०० टक्के सुधारतो आहोत”, असंही मंगेश देसाई म्हणाले.