शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर’ चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट १३ मे २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. प्रेक्षकांच्या या प्रतिसादानंतर काही महिन्यांपूर्वी ‘धर्मवीर २’ चित्रपटाची घोषणा निर्मात्यांकडून करण्यात आली होती. मात्र, हा सिनेमा केव्हा प्रदर्शित होणार याची तारीख अद्याप जाहीर केलेली नव्हती. अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर ‘धर्मवीर २’ सिनेमाचं नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या समोर आहे. पहिल्या भागाप्रमाणे दुसऱ्या भागातही अभिनेता प्रसाद ओक आनंद दिघे यांची भूमिका साकारणार आहे. त्याच्या लूकने आणि ‘धर्मवीर २’ चित्रपटाच्या नवीन पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘धर्मवीर २’ सिनेमाचं हे नवीन पोस्टर लॉन्च करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, निर्माते मंगेश देसाई, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे, बॉलीवूड अभिनेता बॉबी देओल यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात मंगेश देसाई यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. ही घोषणा म्हणजे, ‘धर्मवीर २’ हा सिनेमा यंदा हिंदीतही प्रदर्शित होणार आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर, संपूर्ण जगभरात हा सिनेमा दाखवला जाणार आहे. पहिल्या भागात आनंद दिघे यांचा राजकीय प्रवास दाखविण्यात आला होता. या चित्रपटाच्या शेवटी त्यांचं निधन झाल्याचंही दाखविण्यात आलं होतं. त्यामुळे आता या चित्रपटाच्या पुढील भागात नेमकं काय दाखवलं जाणार आहे, याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

हेही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘धर्मवीर २’ चित्रपटात दिसणार? पोस्टर लाँचच्या वेळी सचिन पिळगावकरांच्या ‘त्या’ वक्तव्याची चर्चा

‘धर्मवीर २’ हा बहुचर्चित चित्रपट क्रांतीदिनी म्हणजे ९ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. या पोस्टरवरचे “आपलं अस्तित्व… फक्त हिंदुत्व!”, “साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट…”, “हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही” असे काही संवाद सर्वांचं लक्ष वेधून घेतात. साधारण दोन वर्षांपूर्वी ३० जूनलाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. यानिमित्ताने कलाकारांकडून मुख्यमंत्र्यांचा सन्मान करण्यात आला.

हेही वाचा : राहुल द्रविडची पुतणी आहे मराठमोळी अभिनेत्री! भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर अदितीची भावुक पोस्ट

‘धर्मवीर २’ सिनेमाचे निर्मिती मंगेश देसाई यांनी केली असून, दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावली आहे. यामध्ये अभिनेता प्रसाद ओक आनंद दिघे यांची, तर क्षितीश दातेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारली आहे. दरम्यान, यावेळी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी प्रसाद ओकच्या कामाचं कौतुक केलं याशिवाय महाराष्ट्राच्या विकासाची देखील माहिती दिली.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dharmaveer 2 movie poster launch prasad oak shared first look of the poster sva 00