Dharmaveer 2 Updates : प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर २’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे आता ‘धर्मवीर २’कडून देखील प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. पहिल्या भागाप्रमाणे दुसऱ्या भागातही अभिनेता प्रसाद ओक आनंद दिघे यांची भूमिका साकारणार आहे. त्याच्या लूकने आणि ‘धर्मवीर २’ चित्रपटाच्या ट्रेलरने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून प्रसाद ओकशिवाय चित्रपटात कोणकोणते कलाकार झळकणार याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता होती. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑनस्क्रीन मुलाची म्हणजे श्रीकांत शिंदे यांची भूमिका चित्रपटात कोण साकारणार हे आता स्पष्ट झालेलं आहे.
हेही वाचा : “जाती हूँ मैं…”, जिनिलीया व रितेश देशमुखच्या मजेशीर व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस, नेटकरी म्हणाले, “तुम्ही दोघं…”
श्रीकांत शिंदे यांची भूमिका साकारणार ‘हा’ अभिनेता
मराठी नाटक, चित्रपटांबरोबरच यापूर्वी ‘बिग बॉस’सारख्या लोकप्रिय शोमध्ये या अभिनेत्याने सहभाग घेतला होता. त्याच्या पहिल्याच चित्रपटामुळे अभिनेत्याला भरभरून प्रसिद्धी मिळाली. अभिजीत पानसे दिग्दर्शित ‘रेगे’ चित्रपट २०१४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटातून एका नव्या अभिनेत्याने कलाविश्वात पदार्पण केलं या अभिनेत्याचं नाव म्हणजे आरोह वेलणकर. त्याच्या पहिल्याच चित्रपटाने त्याला प्रसिद्धी मिळवून दिली होती. हाच आरोह ‘धर्मवीर २’मध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांची भूमिका साकारणार आहे.
अभिनेता आरोह वेलणकरने श्रीकांत शिंदे यांच्याबरोबर फोटो शेअर करत “रील वर्सेस रीअल…या चित्रपटाचा एक भाग होता आलं याचा मला कायम आनंद असेल” असं कॅप्शन दिलं आहे. आरोहने शेअर केलेल्या फोटोवर मराठी कलाकारांसह त्याच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, ऑगस्ट क्रांती दिनाचं औचित्य साधत ‘धर्मवीर २’ ( Dharmaveer 2 ) हा बहुचर्चित चित्रपट येत्या ९ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची निर्मिती अभिनेते मंगेश देसाई यांनी केली असून, दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी सांभाळली आहे.