‘मुळशी पॅटर्न’, ‘धर्मवीर’, ‘सरसेनापती हंबीरराव’ अशा वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांतून प्रेक्षकांवर आपली छाप पाडणारे लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण विठ्ठल तरडे हे कायमच चर्चेत असतात. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘सरसेनापती हंबीरराव’ हा त्यांचा चित्रपट चांगलाच हिट ठरला. चित्रपटसृष्टी ते अगदी शेतीच्या कामात रमणारे प्रवीण तरडे यांचा आज वाढदिवस आहे. त्या निमित्ताने अभिनेता प्रसाद ओकने त्यांच्यासाठी खास पोस्ट लिहून त्यांना वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखले जाणारे प्रवीण तरडे हे उत्तम दिग्दर्शकही आहेत. त्यांनी अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर’ चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटात प्रसाद ओकची मुख्य भूमिका होती. त्याने धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील प्रसाद ओकच्या भूमिकेबरोबरच प्रवीण तरडे यांच्या दिग्दर्शनाचंही तेवढंच कौतुक झालं होतं. याच चित्रपटाच्या आठवणींना उजाळा देत प्रसादने त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
आणखी वाचा- “गेल्या अनेक वर्षांपासून…” प्रवीण तरडेंचा वाढदिवस साजरा केल्यानंतर राजू शेट्टींची खास पोस्ट
आपल्या पोस्टमध्ये प्रसाद ओकने लिहिलं, “प्रिय प्रवीण, वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा…!!! माझ्यामुळे तुझ्या चेहऱ्यावर आलेलं हे प्रसन्न हास्य कायम ठेवण्याचा प्रयत्न मी ‘धर्मवीर’च्या पुढच्या भागातही करेन अशी खात्री देतो. तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत आणि तुझ्या सर्व कलाकृतींना भरघोस यश मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!” या पोस्टमधूनच प्रसाद ओकने ‘धर्मवीर’च्या दुसऱ्या भागाचे संकेत दिले आहेत.
दरम्यान ठाण्यात शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाला. ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट १३ मे २०२२ ला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी केलं आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता.