प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’ची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ हे चार ऐतिहासिक चित्रपट प्रचंड गाजले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठा गल्लाही जमवला. त्यानंतर आता ‘श्री शिवराज अष्टका’तील पाचवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपट नरवीर तानाजी मालुसरे यांच्या कामगिरीवर आधारित असणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्या इतिहासातील महत्त्वपूर्ण घडामोडी या शिवराज अष्टकाद्वारे उलगडल्या जात आहेत. या माध्यमातून तब्बल आठ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकातील फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड आणि शेर शिवराज हे चार चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाले.
आणखी वाचा : Video : भर मुलाखतीत चिन्मय मांडलेकरच्या एका कृतीने वेधलं लक्ष, दिग्पाल लांजेकर म्हणाले “हे पाहून…”
शेर शिवराजनंतर शिवराज अष्टकातील कोणता अध्याय प्रेक्षकांसमोर येणार याची अनेक प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. अखेर त्याचे उत्तर समोर आले आहे. नुकतंच अभिनेता चिन्मय मांडलेकर याने शिवराज अष्टकातील पुढील चित्रपटाचा पहिला लूक शेअर केला आहे.
चिन्मय मांडलेकरने इन्स्टाग्रामवर नुकतंच शिवराज अष्टाकातील आगामी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. हे पोस्टर अतिशय आकर्षक आणि लक्ष वेधून घेणारे आहे. या पोस्टरवर सुरुवातीला शिवराज अष्टकातील पाचवं चित्रपुष्प असे लिहिले आहे. त्याखाली अगदी ठळक अक्षरात ‘सुभेदार’ असे लिहिले असून गड आला पण… असे लिहिले आहे. काळावर नाव कोरणाऱ्या महावीराची महागाथा….सुभेदार असे कॅप्शन या फोटोला देण्यात आले आहे.
या पोस्टरवरुन हा चित्रपट नरवीर तानाजी मालुसरे यांच्या कोंढाणा मोहिमेवर आधारित असल्याचे पाहायला मिळत आहे. आज या किल्ल्याला सिंहगड असे नाव असेल तरी ते नाव नेमकं कसे पडले, गड आला पण सिंह गेला हे वाक्य आणि त्यामागची कथा आता प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट येत्या जून २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे.