दिग्पाल लांजेकर लिखित दिग्दर्शित ‘सुभेदार’ हा चित्रपट २५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ या चार चित्रपटानंतर ‘श्री शिवराज अष्टका’तील पाचवा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट नरवीर तानाजी मालुसरे यांच्या कामगिरीवर आधारित आहे. आता नुकतंच या चित्रपटातील एक पोस्टर समोर आलं आहे. यात त्यांनी रायबाच्या लग्नाच्या तयारीत गुंतलेल्या समस्त मालुसरे कुटुंबियांचा पहिला लूक शेअर केला आहे.
आपले शौर्य, निष्ठा यांच्यासह बलिदान देऊन स्वराज्याचा पाया बळकट करणारे नरवीर तान्हाजी मालुसरे. स्वराज्याच्या सेवेतील कामगिरीपुढे त्यांना आपल्या संसाराचेही भान नव्हते. ‘आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं’ अशी गर्जना करत मोहीम फत्ते करणाऱ्या या शूर योद्ध्याला त्यांच्या कुटुंबानेही तितकीच मोलाची साथ दिली. ‘सुभेदार’ या चित्रपटात मालुसरे कुटुंबियांची पहिली झलक समोर आली आहे.
आणखी वाचा : “‘बाईपण भारी देवा’मध्ये माझ्याबरोबर झळकलेली ती मुलगी…” अखेर सोहम बांदेकरने दिले स्पष्टीकरण, म्हणाला “आई माझ्यावर…”
दिग्पाल लांजेकर यांनी इन्स्टाग्रामवर नुकतंच याचं एक पोस्टर शेअर केले आहे. यात संपूर्ण मालुसरे कुटुंब पाहायला मिळत आहे. त्यात त्यांची आई, पत्नी, भाऊ, वहिनी, मुलगा आणि सदैव खंबीर साथ देणारे शेलारमामा दिसत आहेत. यातील सुभेदारांची भूमिका अभिनेता अजय पूरकर साकारत आहेत. तर त्यांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या त्यांच्या पत्नीची सावित्रीबाईंची भूमिका अभिनेत्री स्मिता शेवाळे यांनी साकारली आहे.
आणखी वाचा : ‘सुभेदार’ चित्रपटाच्या पोस्टरवर झळकला ‘नवे लक्ष्य’ मालिकेतील अभिनेता, सोहम बांदेकर म्हणाला “भावा…”
तसेच सावलीप्रमाणे आपल्या थोरल्या भावाची पाठराखण करणाऱ्या सूर्याजी मालुसरेंच्या दमदार भूमिकेत अभिजीत श्वेतचंद्र, त्यांच्या पत्नीची म्हणजे यशोदाबाईंची भूमिका अभिनेत्री शिवानी रांगोळेने साकारली आहे. तर मालुसरे कुटुंबियांचा आधारवड असणाऱ्या शेलारमामांच्या भूमिकेत समीर धर्माधिकारी दिसत आहेत. तान्हाजीरावांच्या आई म्हणजे पार्वतीबाईंच्या भूमिकेत उमा सरदेशमुख पाहायला मिळत आहे. तर सुभेदारांचा मुलगा रायबाच्या भूमिकेत अर्णव पेंढारकर पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : ‘सुभेदार’ चित्रपटात तानाजी मालुसरे यांची भूमिका कोण साकारणार? नाव आलं समोर
दरम्यान ए.ए.फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंटची प्रस्तुती असलेल्या ‘सुभेदार’ चित्रपटाची निर्मिती राजवारसा प्रोडक्शन, मुळाक्षर प्रोडक्शन, पृथ्वीराज प्रोडक्शन, राजाऊ प्रोडक्शन, परंपरा प्रोडक्शन यांनी केली आहे. हा चित्रपट येत्या २५ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.