गेले अनेक महिने ‘सुभेदार’ या मराठी चित्रपटाची प्रचंड चर्चा आहे. अखेर २५ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या चित्रपटातून सुभेदार तानाजी मालुसरे यांचा पराक्रम आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळत आहे. याच विषयावरील एक बिग बजेट हिंदी चित्रपट तीन वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं नाव ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ असं होतं. तर आता या चित्रपटाला IMDB वर ‘सुभेदार’ने मागे टाकलं आहे.
सुभेदार चित्रपटाला सध्या सर्वत्र खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाचं प्रेक्षक खूप कौतुक करत आहेत. या चित्रपटाची अजय देवगणच्या ‘तान्हाजी’ या चित्रपटाशीही तुलना केली जात आहे. पण यामध्ये ‘सुभेदार’ हा चित्रपट वरचढ ठरला आहे. IMDB साईटवर ‘सुभेदार’ला ‘तान्हाजी’ चित्रपटापेक्षा जास्त रेटिंग मिळाले आहेत.
१० जानेवारी २०२० रोजी ‘तान्हाजी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. ओम राऊतने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं तर अजय देवगन आणि काजोल यांनी या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारल्या. या चित्रपटाने जगभरातून बक्कळ कमाई केली. या चित्रपटाला IMDB वर ७.५ रेटिंग आहे. तर दुसरीकडे सुभेदार या चित्रपटाला IMDB वर ९.७ रेटिंग आहे.
दरम्यान, ‘सुभेदार’ या चित्रपटामध्ये मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, स्मिता शेवाळे, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, विराजस कुलकर्णी, शिवानी रांगोळे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.