‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. केदार शिंदे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. आता या निमित्ताने दिग्दर्शक केदार शिंदे यांनी अभिनेत्री सुकन्या मोने यांच्याबद्दल एक खास पोस्ट शेअर केली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची टीम या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. तर या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच केदार शिंदे आणि सुकन्या मोने यांना एकमेकांबरोबर काम करण्याची योग आला. तर गेल्या अनेक वर्षांपासून ते दोघे एकमेकांना ओळखतात. आता केदार शिंदे यांनी सुकन्या मोने यांच्याबरोबरचा एक फोटो शेअर करत त्यांचा भरभरून कौतुक केलं.
आणखी वाचा : “आज तू सातासमुद्रापार…” लेकीच्या वाढदिवशी सुकन्या मोने भावूक, पोस्ट चर्चेत
केदार शिंदे यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये सुकन्या मोने केदार शिंदे यांच्या डोक्याला मालिश करताना दिसत आहेत. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा हा बिहाइंड द सीन फोटो पोस्ट करत त्यांनी लिहिलं, “काही लोकं जन्माला येतात ती परोपकार करण्यासाठी! स्वतः आधी दुसऱ्याचा विचार ! ताटातलं अन्न सुध्दा आधी दुसऱ्याला भरवतील. ‘बाईपण भारी देवा’मधील मधली बहिण साधना आणि सुक्कुताई यांच्यात कणाचाही फरक नाही. मी सातवीत असताना “झुलवा” नाटक पाहिलं तेव्हापासून मी तिचा फॅन. पुढे तिने जे जे काम केलं त्याचा प्रेक्षक! पण एकत्र काम करण्याचा योग या सिनेमाच्या निमित्ताने आला. कॅरेक्टरमध्ये तिला तिचं सगळं ठरवायचं असतं आणि करायचही असतं. आपण फक्त हवं नको तेवढच सांगायचं.”
हेही वाचा : दोन दिवसांत पिंपल घालवायचेत? सुकन्या मोनेंनी सांगितला सोपा घरगुती उपाय, म्हणाल्या…
पुढे त्यांनी लिहिलं, “माझी तिची घट्ट मैत्री झाली ती जुलियाच्या निमित्ताने. शिवाजीपार्क नाक्यावर ती आणि मोने काका जुलियाला घेऊन यायचे आणि ती छोटी जुलिया आमच्या कडेवर बसून जप्सी मधले मासे पाहायची. तिच जुलिया आता परदेशात शिक्षणासाठी गेली आहे. पण तिचं सिनेमातलं पदार्पण याच सिनेमाच्या निमित्ताने आहे. सुकन्या ताईला एवढंच सांगणं आहे की, अशीच राहा. कारण अशी लोकं आता देव बनवायला विसरला आहे.” आता केदार शिंदे यांची ही पोस्ट चर्चेत आली असून त्यावर कमेंट करत नेटकरी त्यांच्यातील हे बॉण्डिंग आवडल्याचं सांगत आहेत.