दिग्दर्शक केदार शिंदे हे मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या दिग्दर्शकांपैकी एक आहेत. आतापर्यंत त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. गेले काही दिवस त्यांच्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटाचे सर्व शो हाउसफुल होत आहेत. आतापर्यंत या चित्रपटाने ६५ कोटींहून अधिक कमाई केली आहे. पण त्यांचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता.
केदार शिंदे यांना त्यांच्या करिअरमध्ये अनेक चढ-उतारांना सामोरं जावं लागलं. याबद्दल त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत मोकळेपणाने भाष्य केलं आहे. ‘जत्रा’ या चित्रपटानंतर त्यांच्या डोक्यावर खूप मोठं कर्ज होतं असंही ते म्हणाले.
केदार शिंदे यांनी सांगितलं, “‘जत्रा’ या चित्रपटादरम्यान माझं सर्व काही पणाला लावलं होतं. मी माझ्या बायकोचे दागिने विकले होते. प्रेक्षकांसाठी ‘जत्रा’ सुपरहिट ठरला. पण त्यावेळी माझ्या डोक्यावर ९० लाखांचं कर्ज होतं. त्यानंतरच्या वर्षांमध्ये माझ्या हातून बरे-वाईट चित्रपट झाले. ‘अगंबाई अरेच्चा २’ चालला नाही. इंडस्ट्रीतील अनेकांनी प्रीमिअरला हा चित्रपट पाहिला होता. सर्वांनी त्याचं कौतुक केलं. पण चित्रपट वाईट झाला आहे हे कुणीही सांगितलं नाही. ज्यांना आपलं मानलं त्यांनी असं करावं? प्रदर्शनाच्या दिवशी सगळीकडे नकारात्मक चर्चा होती, त्यामुळे मी दुखावलो आणि हिंदी मालिकाविश्वाकडे वळलो. इथेही काम करण्यासाठी मला समोरून विचारण्यात आलं होतं.”
केदार शिंदे यांचे बोलणं आता चर्चेत आलं आहे. आता त्यांचा ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर पुढील काळात ते प्रेक्षकांसाठी कुठला खास चित्रपट घेऊन येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.