‘करून गेलो गाव’ या नाटकात विनोदवीर भाऊ कदम आणि ओंकार भोजने यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या नाटकाचा शंभरावा प्रयोग नुकताच पार पडला. या नाटकाचे निर्माते प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी या निमित्ताने नुकत्याच एका मुलाखतीला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी मराठी चित्रपटांशिवाय राज्यातील राजकीय परिस्थिती आणि बॉलीवूड चित्रपटांबाबत भाष्य केलं.
महेश मांजरेकर झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, “आजच्या काळात प्रत्येक नागरिकाने राजकीयदृष्ट्या सतर्क राहणं महत्त्वाचं आहे. कारण, तुम्ही एकदा मतदान केलं की, पुढची पाच वर्ष तुमच्याकडे पर्याय नसतो. माझ्या ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटाचा क्लायमॅक्स सुद्धा याच आशयावर आधारित होता.”
हेही वाचा : तेलुगू चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी साकारणार खलनायक; दग्गुबती व्यंकटेशच्या ‘सैंधव’चा दमदार टीझर प्रदर्शित
महेश मांजरेकर पुढे म्हणाले, “अगदी अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘जवान’मध्ये सुद्धा असाच क्लायमॅक्स करण्यात आला आहे. ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’चा क्लायमॅक्स त्यांनी सेम टू सेम तसाच उचलून घेतला आहे. सचिन आणि माझा ‘मी शिवाजीराजे…’मधील जो शेवटचा सीन आहे तो आणि ‘जवान’चा क्लायमॅक्स सारखाचं असल्याचं मला अनेकांनी सांगितलं. मी ‘जवान’ अद्याप पाहिलेला नाही…पण, हे ऐकून मला चांगलं देखील वाटलं.”
“मला एवढचं सांगायचं आहे की, या चित्रपटांमध्ये दाखवलेल्या क्लायमॅक्सप्रमाणे प्रत्येक नागरिकाने राजकीयदृष्ट्या जागृक असणं गरजेचं आहे.”, असं मत महेश मांजरेकरांनी मांडलं. दरम्यान, ‘जवान’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करून जवळपास १ हजार ५५ कोटी कमावले आहेत.