सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या चित्रपटाची दिग्दर्शक आतुरतेने वाट पाहत असतात. ‘झुंड’ चित्रपटाच्या भरघोस यशानंतर त्यांनी काही दिवसांपूर्वीच ‘घर, बंदूक, बिरयानी’ चित्रपटाची घोषणा केली. हा चित्रपट नेमका काय असणार? याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागून राहिली होती. आता दिवाळीच्या मुहुर्तावर चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. टीझर प्रदर्शित होताच प्रेक्षकांचा याला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचं दिसत आहे.

झी स्टुडिओजची निर्माती असणाऱ्या या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये फक्त बॅकग्राऊंड म्युझिक ऐकायला मिळत आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये एकही संवाद नाही. पण चित्रपटामधील नागराज मंजुळे यांचा लूक अगदी थक्क करणारा आहे. तसेच चित्रपटामधील इतर कलाकारांचे चेहरेही यामध्ये दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ

हातात बंदुक, अॅक्शन सीन करताना नागराज यामध्ये दिसत आहेत. तर त्यांच्या जोडीला अभिनेते सयाजी शिंदे तसेच आकाश ठोसर यांचा या चित्रपटामधील लूकही समोर आला आहे. चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर पोलिस व गुन्हेगार यांच्याभोवती फिरणारी ही चित्रपटाची कथा आहे असं दिसून येत आहे.

आणखी वाचा – मानसिक व शारीरिक हिंसाचाराच्या आरोपानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नीला बेदम मारहाण, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

नागराज मंजुळे यांच्या या चित्रपटाचं दिग्दर्शन हेमंत जंगल अवताडे यांनी केलं आहे. चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर प्रेक्षक नागराज यांच्या नव्या लूकचं कौतुक करत आहेत. तसेच नागराज मंजुळे यांचा स्वॅग कमालीचा आहे, आम्ही चित्रपटाची वाट पाहत आहोत असं प्रेक्षकांनी कमेंटच्या माध्यमातून म्हटलं आहे.