दिग्दर्शक नागराज मंजुळे मनोरंजन सृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. त्यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्यांच्या चित्रपटांकडे प्रेक्षकांचं नेहमीच लक्ष लागलेलं असतं. नागराज मंजुळे यांचा काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘सैराट’ हा चित्रपट खूप गाजला. या चित्रपटातील आर्ची आणि परश्याच्या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. या चित्रपटाची क्रेझ अजूनही तितकीच आहे. आता ‘सैराट २’बद्दल स्वतः नागराज मंजुळे यांनी मोठा खुलासा केला आहे.
सध्या ते त्यांच्या ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटामुळे चांगलेच चर्चेत आहेत. ते या चित्रपटाच्या टीमबरोबर या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. या प्रमोशनच्या निमित्ताने ते अनेक मुलाखती देत आहेत. तर नुकतंच ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ‘सैराट २’ येणार का? याबद्दल भाष्य केलं आहे.
‘सैराट २’ येणार का? या प्रश्नाचं उत्तर देताना नागराज म्हणाले, “हा चित्रपट येणार का हे मी पण आत्ता सांगू शकत नाही. पण भविष्यात हा चित्रपट येणार नाही असंही नाही. कारण आत्ता मी याचा विचार केलेला नाही आणि भविष्याचं मला माहित नाही. ‘घर बंदूक बिरयानी’ हा चित्रपट करशील का? असं जर आधी मला आधी विचारलं गेलं असतं तर माझं उत्तर ‘नाही’ असंच असतं. पण आता मी हा चित्रपट केला. त्यामुळे ‘सैराट २’ करणार आहे असंही नाही आणि लगेच करणार असंही नाही.”
हेही वाचा : “छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट…” नागराज मंजुळे स्पष्टच बोलले
दरम्यान, नागराज मंजुळे यांचा ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटात आकाश ठोसर आणि सोनाली पाटील मुख्य भूमिकेत आहेत. तर त्यांच्याबरोबर अभिनेते सयाजी शिंदे देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. हा त्यांचा आगामी चित्रपट ७ एप्रिल रोजी प्रदर्शित होईल.