दिग्दर्शक नागराज मंजुळे आज मनोरंजन सृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. त्यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्यांच्या चित्रपटांकडे प्रेक्षकांचं नेहमीच लक्ष लागलेलं असतं. सध्या ते त्यांच्या ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाची घोषणा होताच सर्व प्रेक्षक कोड्यात पडले होते. याचं कारण म्हणजे या चित्रपटाचं नाव. आता नागराज मंजुळे यांनी त्यांच्या चित्रपटाचं नाव ‘घर बंदूक बिरयानी’ का ठेवलं याचा खुलासा त्यांनी स्वतः केला आहे.
नागराज मंजुळे सध्या त्यांच्या आगामी ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहेत. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होत असून त्या निमित्ताने ते सध्या अनेक मुलाखती देत आहेत. आता ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी या चित्रपटाच्या नावामागील गोष्ट सांगितली.
आणखी वाचा : “छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट…” नागराज मंजुळे स्पष्टच बोलले
ते म्हणाले, “या चित्रपटाची स्क्रिप्ट जेव्हा माझ्याकडे आली तेव्हा या चित्रपटाचं नाव फक्त ‘बिरयानी’ होतं. माझ्या इतर चित्रपटांसारखंच एक अक्षरी. याची मूळ कथा हेमंतने लिहिली होती. या चित्रपटात काम करावं आणि जर ही कथा आवडली तर या चित्रपटाची निर्मितीही करावी अशी माझी इच्छा होती. लॉकडाउनच्या आधी ही स्क्रिप्ट माझ्याकडे आली. पहिल्या वाचनात मला ती जरा आवडली नाही. त्यामुळे विचार करू असं मी हेमंतला म्हटलं. माझा जो स्वभाव आहे त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं या कथेत होतं. मग या चित्रपटाची कथा आपण दोघांनी मिळून परत लिहायची असं मी आणि हेमंतने ठरवलं.”
हेही वाचा : “मराठी सिनेसृष्टीत कंपुशाही…” नागराज मंजुळे यांचं वक्तव्य चर्चेत
पुढे ते म्हणाले, “आम्ही या चित्रपटाची कथा नव्याने लिहायला सुरुवात केल्यावर या चित्रपटाचं नाव ‘घर बंदूक बिरयानी’ असावं असं मला वाटलं. याचं कारण म्हणजे ही कथा बिर्याणीत मावत नाही असं जाणवलं मला आणि मग म्हणून या चित्रपटाचे नाव ‘घर बंदूक बिरयानी’ ठेवायचं असं ठरलं. हा चित्रपट म्हणजे तीन लोकांची गोष्ट आहे. पण या नावामागचा नेमका अर्थ काय हे आत्ता सांगण्यात मजा नाही. तुम्ही चित्रपट पाहिल्यावरच तुम्हाला या नावामागचा अर्थ कळेल.”
चित्रपटात सयाजी शिंदे हे एका वेगळ्याच आणि हटके भूमिकेत दिसणार आहेत. याबरोबरच नागराज मंजुळेसुद्धा डॅशिंग अशा पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहेत. शिवाय आकाश ठोसर आणि सायली पाटील यांचीसुद्धा एक हटके भूमिका यात पाहायला मिळणर आहे. हा चित्रपट ७ एप्रिल २०२३ रोजी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.