काही चित्रपट लोकप्रिय ठरतात. असे गाजलेले सिनेमे अनेक वर्षांनंतर पुन्हा चित्रपटगृहात प्रदर्शित झाले, तर प्रेक्षक पुन्हा गर्दी करताना दिसतात. गेल्या काही दिवसांत काही मोजके सिनेमे पुन्हा प्रदर्शित करण्याचा कल वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामध्ये सत्या, कहो ना प्यार है, ये जवानी है दीवानी, सनम तेरी कसम ते करण-अर्जुन अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे. मात्र, मराठीमधील फारसे चित्रपट री-रिलीज म्हणजेच पुन्हा प्रदर्शित होत नाहीत. याचे काय कारण असू शकते, यावर प्रसिद्ध दिग्दर्शक आदित्य सरपोतदारने वक्तव्य केले आहे.
मराठी चित्रपट का पुन्हा प्रदर्शित केले जात नाहीत?
आदित्य सरपोतदार व सई ताम्हणकरने ‘बोल भिडू’च्या यूट्यूब चॅनेलवर हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी विविध विषयांवर गप्पा मारल्या. प्रेक्षकांचा चित्रपटांकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय असू शकतो, प्रेक्षक एखादा चित्रपट पाहताना काय विचार करूशकतात. जे चित्रपट री-रिलीज होतात, ते पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी का असते. याबरोबरच मराठी चित्रपट री-रिलीज का होत नाहीत, यावर दिग्दर्शक आदित्य सरपोतदारने वक्तव्य केले आहे. याबाबत सई ताम्हणकरसह बोलताना आदित्य सरपोतदारने म्हटले की, मराठीमध्ये असे काही सिनेमे आहेत, जे पुन्हा प्रदर्शित केले, तर प्रेक्षक ते पाहण्यासाठी चित्रपटगृहात येतील. पण, ते का होत नाही, तर आपण कुठेतरी इंडस्ट्री म्हणून खूप भूतकाळात, आठवणींत अडकून बसलो आहोत. हिंदी चित्रपटांकडे ते नवीन पद्धतीने बघत आहेत. आपण नवीन कथानकांना वाव देणं गरजेचं आहे. हे माझं वैयक्तिक मत आहे. पण, मला वाटतं की, आपण रिस्क फार कमी घेतो. आपण सुरक्षित व सोपा मार्ग निवडतो. आता नवीन चित्रपट निर्मात्यांकडून यामध्ये बदल झाले, तर ते बघण्यात मजा येईल. ‘सीक्रेट ऑफ शिलेदार’मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत, भूतकाळ आहे, जीवाभावाचा विषय आहे; पण, ही २०२५ मधील समांतर कथा आहे.
याबरोबरच आदित्य सरपोतदारने याच मुलाखतीत मराठी सिनेमांनी कमाईचे आकडे दाखवणे किती गरजेचे आहे, यावर वक्तव्य केले आहे. आदित्य सरपोतदारने म्हटले की, ‘सैराट’ने जेव्हा तो ठरावीक आकडा गाठला किंवा वेड, बाईपण भारी देवा या सिनेमांनी एक आकडा गाठल्यानंतर संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये एक ऊर्जा आली. हे कुठेतरी होऊ शकतं आणि आपण सगळे मिळून हे करू शकतो. आता ती ऊर्जा आपल्याला सतत हवी आहे.
दरम्यान, आदित्य सरपोतदार दिग्दर्शित मुंज्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटात अभय वर्मा व शर्वरी वाघ प्रमुख भूमिकांत दिसले होते.