सध्या मराठीमध्ये ऐतिहासिक चित्रपटांची चलती आहे. ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘हर हर महादेव’, ‘पावनखिंड’ सारख्या ऐतिहासिक मराठी चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्तमोत्तम प्रतिसाद मिळाला. आता याच ऐतिहासिक चित्रपटांबाबत दिग्दर्शक-निर्माते महेश टिळेकर यांनी भाष्य केलं आहे. महेश टिळेकर प्रत्येक विषयांवर आपलं मत स्पष्टपणे मांडताना दिसतात. ‘हवाहवाई’ हा त्यांचा प्रदर्शित झालेला शेवटचा चित्रपट. त्यांनी आता ऐतिहासिक चित्रपटांबाबत केलेलं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले महेश टिळेकर?
‘शककर्ते शिवराय’ हे ऐतिहासिक पुस्तक एक लहान मुलगा वाचत असलेला फोटो महेश यांनी शेअर केला. हा फोटो शेअर करताना ते म्हणाले, “खरा इतिहास वाचून समजून घ्यावा. दोनच दिवसांपूर्वी माझ्या एका हितचिंतक मित्राने मला सुचवले की मी ‘गाव तसं चांगलं’,’वन रूम किचन’, ‘हवाहवाई’ सारखे कौटुंबिक, विनोदी सिनेमे केले. आता पुढचा सिनेमा ऐतिहासिक करावा आणि तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर असावा. यावर मी त्याला माझं स्पष्ट मत सांगितलं.”

“ऐतिहासिक सिनेमा तो ही छत्रपती शिवाजी महाराजांवर करायचा तर ते शिवधनुष्य पेलण्याची कुवत माझ्यात नाही आणि बॉलिवूडमध्ये जसं हिरोची एंट्री हवेतून उडी मारत गुंडांना मारहाण करत होते. तशी ऐतिहासिक पात्रे दात ओठ खात, बेंबीच्या देठापासून किंचाळत सिनेमातून दाखवणं मनाला पटत नाही. लोकांना आकर्षित करण्यासाठी गल्ला भरण्यासाठी ऐतिहासिक सिनेमात मसाला भरून पुढच्या पिढीला सिनेमातून चुकीचा इतिहास दाखवण्याचं पाप करण्यापेक्षा खरा इतिहास पुस्तकातून वाचून समजावा म्हणून मी इतरांना पुस्तकं भेट देईन.”

आणखी वाचा – अक्षय कुमार साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका; CM शिंदे, राज ठाकरेंच्या उपस्थित चित्रपटाची घोषणा

पुढे ते म्हणाले, “माझं सगळं ऐकून घेऊन मित्राने पुन्हा सल्ला दिला की मला जर चांगला फायनान्स मिळाला तर काय हरकत आहे असे सिनेमे करायला. फायनान्स मिळतोय म्हणून स्वतःच्या सोयीप्रमाणे इतिहास बदलून केवळ पैसे मिळवण्यासाठी धंदाच करण्याच्या हेतूने ऐतिहासिक सिनेमा केला तर लोकांच्या शिव्या मिळतीलच. पण जेव्हा जेव्हा कुठेही महाराजांची प्रतिमा दिसेल, त्यांचे चित्र समोर येईल तेव्हा ज्यांच्यामुळे आज आपण आहोत त्या माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांशी, त्यांचा पराक्रम, इतिहासाशी मी प्रतारणा केल्याचं शल्य मला कायम बोचत राहणार, ती जखम अश्वत्थामाच्या जखमेसारखी मरेपर्यंत न भरून येणारी असेल. सिनेमॅटिक लिबर्टी घेत धंदेवाईक सिनेमा करून पैसा कमवणे एकवेळ मला मान्य आहे पण खोटा इतिहास, खोट्या घटना दाखवून सिनेमा करून आपला मोठेपणा मिरवत लोकांचे पैसे लुटून त्यांच्या नजरेत दरोडेखोर म्हणून आपली ओळख आपणच का निर्माण करून द्यावी?महाराज आज असते तर आपल्याला दरोडेखोर म्हणून तोफेच्या तोंडी दिलं असतं की कडेलोट केला असता याची क्षणभर कल्पना करून पाहा.” आम्ही तुमच्या मताशी सहमत आहोत असं नेटकऱ्यांनी महेश यांच्या पोस्टवर कमेंट करत म्हटलं आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Director producer mahesh tilekar talk about marathi historical movie see details kmd
Show comments