नटरंग’, ‘टाईमपास’, ‘न्यूड’ यासारखे वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट बनवणारे दिग्दर्शक रवी जाधव मराठी चित्रपटसृष्टीत एक प्रख्यात दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. दिग्दर्शक रवी जाधव हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. ते त्यांच्या आगामी चित्रपटाबद्दल सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना माहिती देत असतात. नुकतंच रवी जाधव यांनी दिग्दर्शक परेश मोकाशी यांचा ‘वाळवी’ हा चित्रपट कसा वाटला? याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
दिग्दर्शक परेश मोकाशी यांचा ‘वाळवी’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात अभिनेता स्वप्निल जोशी आणि सुबोध भावे हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाचे पोस्टर, ट्रेलर आणि गाणी चांगलीच हिट होताना दिसत आहे. अनेक कलाकारांनी हा चित्रपट कसा वाटला याबद्दल त्यांचे निरीक्षण नोंदवले आहे. रवी जाधव यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी या चित्रपटाबद्दल सांगितले आहे.
आणखी वाचा : Vaalvi Movie review : मराठी प्रेक्षकांचं डोकं पोखरणारा स्वप्नील-सुबोधचा ‘वाळवी’ पाहायलाच हवा, कारण…
रवी जाधव यांची पोस्ट
“आज रविवार, आज आपण एक उत्कृष्ट मराठी चित्रपट थिएटर मध्ये जाऊन आपल्या सुट्टीचा आनंद द्विगुणीत करु शकता!
‘वाळवी’ या चित्रपटाचे कौतुक आपण अनेक मान्यवरांकडून ऐकले असेलच त्यामुळे त्यावर अधिक काही न बोलता बोलून मी एवढच सांगेन की हा चित्रपट लवकरात लवकर म्हणजे आजच्या आजच थिएटर मध्ये जाऊन पहा आणि इन्जॉय करा!!!
परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी, स्वप्निल जोशी, शिवानी सुर्वे, अनिता दाते, सुबोध भावे सर्वच अप्रतिम!!!
झी स्टुडिओच्या मंगेश कुलकर्णी, अश्विन पाटील आणि संपुर्ण टिमला हा चित्रपट सादर केल्याबद्दल प्रचंड प्रेम!!!
मराठी चित्रपटांच्या नावाने चांगभलं”, असे रवी जाधव यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा : वाळवी चित्रपट कसा वाटला? प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला “मी कितीही वेळा…”
दरम्यान झी स्टुडिओज आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी ‘वाळवी’ची निर्मिती केली आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि सवांद परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांचे आहेत. यात स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते, शिवानी सुर्वे हे कलाकार झळकणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर चांगलाच हिट ठरताना दिसत आहे. यात हे कलाकार एका वेगळ्याच अंदाजात दिसत असून त्यांच्या व्यक्तिरेखा चित्रपटाबद्दलची उत्कंठा अधिकच वाढवणाऱ्या आहेत. ‘वाळवी’ हा मराठीतील पहिला थ्रिलकॅाम चित्रपट आहे.