रवी जाधव हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक आहेत. त्यांनी फक्त मराठीच नव्हे तर अनेक हिंदी चित्रपट व वेब सीरिजचं दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे. रवी जाधव आणि त्यांच्या पत्नी मेघना जाधव यांना अथर्व नावाचा मुलगा आहे. अथर्वने कॅनडामधून त्याचं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे, याची माहिती रवी जाधव यांनी दिली आहे.
अथर्वबरोबरचे काही फोटो पोस्ट करत रवी जाधव यांनी मुलाच्या कामगिरीबद्दल सांगितलं. “आम्हा पालकांसाठी अभिमानाचा क्षण! माझ्या मुलाने नुकतीच OCAD युनिव्हर्सिटी, कॅनडातून डिजीटल फ्युचर्समध्ये बॅचलर ऑफ डिझाईन (ऑनर्स) पदवी पूर्ण केली. आम्हाला याचा खूप आनंद होत आहे. त्याला उत्तम कामगिरी करताना आणि त्याचं ध्येय साध्य करताना पाहणं हा एक अविश्वसनीय प्रवास होता,” असं रवी जाधव यांनी म्हटलं आहे.
रवी जाधव यांनी या फोटोंमध्ये अथर्वचा एकट्याचा एक फोटो शेअर केला आहे. तसेच अथर्व व मेघना यांचा आणि एक फॅमिली फोटो पोस्ट केला आहे. या फोटोंमध्येही तिघेही छान दिसत आहेत. रवी यांच्या पोस्टवर कमेंट करून चाहते व सिनेसृष्टीतील लोक त्याला शुभेच्छा देत आहेत.