रोहित शेट्टी बॉलिवूडमधील यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक आहे. त्याचे सगळेच चित्रपट प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवतात. त्याच्या डॅशिंग अंदाजाबरोबरच तो त्याच्या मराठमोळ्या अंदाजासाठीही नेहमी चर्चेत असतो. रोहित शेट्टीचं मराठी संस्कृतीशी खूप खास कनेक्शन आहे. आता त्याने त्याला कोणता मराठमोळा पदार्थ आवडतो हे सांगितलं आहे.
रोहित शेट्टी नुकताच त्याचा पहिला मराठी चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन आला. ‘स्कूल कॉलेज आणि लाईफ’ असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटात तेजस्वी प्रकाश आणि करण परब यांच्या प्रमुख भूमिका आहेत. गेले काही दिवस या चित्रपटाची टीम या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत होती. याचनिमित्त ‘लोकमत’ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याने त्याला आवडणारा मराठमोळा पदार्थ कोणता याचा खुलासा केला.
आणखी वाचा : तेजस्वी प्रकाशचं आडनाव काय? स्वतः अभिनेत्रीनेच केला खुलासा; म्हणाली, “माझं पूर्ण नाव…”
तुझा आवडता महाराष्ट्रीयन पदार्थ कोणता? असं विचारल्यावर रोहित म्हणाला की, “मला झुणका-भाकरी आणि ठेचा खूप आवडतो.” रोहितचं हे उत्तर ऐकून त्याचे चाहते आश्चर्यचकित झाले. आता त्याच्या या उत्तराचं आणि मराठी संस्कृतीशी त्याच्या असलेल्या खास कनेक्शनचं नेटकरी कौतुक करत आहेत.
दरम्यान, ‘स्कूल कॉलेज आणि लाईफ’ चित्रपटाची निर्मिती रोहित शेट्टीने केली आहे. हा चित्रपट गेल्याच आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला आला. तर या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता रोहित त्याच्या ‘इंडियन पुलिस फोर्स’ या सिरिजच्या कामामध्ये व्यग्र आहे.