केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद हा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. खास करून महिला प्रेक्षक या चित्रपटाला तुडुंब गर्दी करत असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. सहा बहिणींच्या आयुष्यावर आधारित असलेल्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. अवघ्या पाच कोटींच्या बजेटमध्ये झालेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर ५० कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांच्या मिळालेल्या उदंड प्रतिसादावर दिग्दर्शक विजू माने यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे; जी सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठी चित्रपट रसिक प्रेक्षकांचे आभार मानत विजू माने यांनी लिहिलं आहे की, “सध्या तिकीट बारीवर ‘बाई पण भारी देवा’ हा ‘भारीच’ जमून आलेला चित्रपट ‘भारी’ गर्दी जमवतो आहे. ज्याचा मला एक मराठी चित्रपटकर्ता म्हणून अभिमान आहेच. त्याबद्दल केदार शिंदे आणि त्याच्या टीमचं, विशेषतः लेडीज ब्रिगेडचं मनापासून अभिनंदन. रसिक प्रेक्षकांना दूषणं देऊन काहीही होत नाही. ‘उत्तम चित्रपट’ हा एकमेव यशाचा मार्ग आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. मराठी लोक मराठी चित्रपटांना गर्दी करत नाहीत याची कारणे मराठी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक यांनी शोधली आणि त्या बरहुकूम चित्रपट बनवले तर लोक गर्दी करतात हे आता दिसून आलं आहे. आत्ताच्या अंदाजानुसार तिकीट बारी वरील सर्वाधिक कमाईचा विक्रम हा चित्रपट करण्याची शक्यता आहे. मला याबाबतीत जिओचे निखिल साने यांचं कौतुक वाटतं. उगाचच कुणाच्यातरी पदरी देव अमाप यश टाकत नसतो. त्यामागे त्या व्यक्तीचा संशोधन, अनुभव आणि योग्य वेळ साधून करावयाच्या गोष्टी याचं कौशल्य अशा अनेक गोष्टी कारणीभूत असतात.”

हेही वाचा – सलमान बिग बॉसमधून बाहेर, आता कुठल्याही पर्वात करणार नाही सूत्रसंचालन?

पुढे विजू माने लिहिलं, “सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही मार्केटच्या स्वभावानुसार आता पुन्हा एकदा स्त्रियांवर आधारित चित्रपटांची लाट येऊ शकेल. त्यात काही वावगं आहे असं मी म्हणणार नाही. कारण जे खपतं ते विकावं हा एक सामान्य बुद्धी असलेल्या व्यावसायिकाचा आडाखा असणारच. मुळात चित्रपट बनवताना कोणीही ‘चला आज वाईट चित्रपट बनवूया’ असं म्हणून चित्रपट बनवत नाही. पण चांगला चित्रपट बनवण्यासाठी केवळ ‘मला ही गोष्ट फार आवडली, म्हणून मी हा चित्रपट केला’ असे निर्माते नकोत. इतर व्यवसायांनी जसं सर्वे, प्रवाह आणि नेमका टार्गेट ऑडियन्स असा अभ्यास करून मग आपले प्रॉडक्ट बाजारात विकण्यासाठी आणण्याची वाट निवडली हीच पद्धत आता मराठी चित्रपटांनी उत्तरोत्तर स्वीकारायला हवी. आणि मराठी प्रेक्षकांना पुन्हा एकदा थिएटरमध्ये टाळ्या, शिट्ट्या नाच करत चित्रपट एन्जॉय करण्याची ‘सवय’ लावायला हवी. आता यातही ‘प्रेक्षकानुनय केलेला चित्रपट’ ‘त्यात काय एवढं?’, ‘मला बाई फार नाही आवडला’, ‘आशयघनता कुठे आहे?’, ‘चित्रपटात डेप्थ नाही’ अशा प्रकारच्या प्रतिक्रिया असतील, त्या असणारच. पण यशासारखं दुसरं काही नाही. ‘बाई पण भारी देवा’च्या सगळ्या टीमला आणि त्या टीमला यश देणाऱ्या अख्या जगभरच्या रसिक प्रेक्षकांना मला मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत. मराठी चित्रपटांच्या नावानं चांगभलं”

हेही वाचा – तमन्ना भाटियाच्या ट्रेंडिंग गाण्यावर मराठमोळ्या अभिनेत्रीचा डान्स; नेटकरी म्हणाले, “अजय देवगण व सनी देओल…”

हेही वाचा – ‘मुन्ना भाई ३’ चित्रपटासाठी भेटले संजय दत्त व अर्शद वारसी? जाणून घ्या नेमकं कारण

यापूर्वी ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाला मिळणाऱ्या प्रेक्षकांच्या प्रतिसादावर अभिनेता सिद्धार्थ जाधवही बोलला होता. एका मुलाखतीमधून सिद्धार्थ म्हणाला होता की, “आज मी चित्रपटगृहात प्रेक्षक पाहतोय, नटूनथटून, गॉगल लावून मराठी चित्रपट पाहायला येत आहेत; मी खरंच तुमचे मनापासून आभार मानतो. मी एक कलाकार व या इंडस्ट्रीचा भाग म्हणून हा आनंद शब्दात मांडू शकत नाही. आकडे, करोड यांच्यापलीकडे तुम्ही येताय, तुम्ही टाळ्या-शिट्या वाजवताय, तुम्ही प्रेम करताय, तुम्ही हसत हसत बाहेर पडताय, ही गोष्ट खूप सुखावणारी आहे.”

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Director viju mane share post about baipan bhaari deva success pps
Show comments