प्रितम पाटील दिग्दर्शित ‘ढिशक्यांव’ हा मराठी चित्रपट १० फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटात प्रथमेश परब, अहमद देशमुख व मेघा शिंदे मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अहमद देशमुखने अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या. मुलाखतीतील त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
‘ढिशक्यांव’ चित्रपटाला काही प्रेक्षकांकडून अडल्ट संबोधलं गेल. यावरुन अहमद देशमुखला मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना अहमद संत्पत होऊन म्हणाला, “ढिशक्यांव चित्रपट अडल्ट आहे? मराठी चित्रपट अडल्ट आहे? काही लोक जर घरी बसून चित्रपटावर कमेंट करत असतील तर चित्रपटगृहांतून बाहेर पडणाऱ्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया घ्या.एकाही प्रेक्षकाने चित्रपटाला अडल्ट म्हटलेलं नाही. मराठी चित्रपट महाराष्ट्रात नाही तर मग कुठे चालवायचे?”.
हेही वाचा>> कतरिना कैफने नशेत एक्स बॉयफ्रेंडला केलेला फोन, स्वत:च केला खुलासा, म्हणाली…
हेही वाचा>> सिद्धार्थ-कियाराच्या रिसेप्शन सोहळ्याला कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या कुटुंबियांची हजेरी, फोटो व्हायरल
“मराठी भाषा जशी वळवावी तशी वळते. या चित्रपटाला जर तुम्ही अडल्ट म्हणत असाल, तर हिंदी चित्रपटांतील नंगानाच तुम्हाला कसा चालतो? गौतमी पाटील नाचलेली चालते. पण एक मराठवाड्यातील शेतकऱ्याचा मुलगा चित्रपट बनवतो, ते चालत नाही. ढिशक्यांव चित्रपट थोडा जरी अडल्ट वाटला तरी उद्या मी चित्रपटगृहातून चित्रपट काढून टाकेन”, असंही अहमद देशमुख म्हणाला.
अहमद देशमुखचा हा व्हिडीओ ‘फिल्मवाला’ या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. त्याने केलेलं हे वक्तव्य सध्या चर्चेत आहे. अहमदने मुख्य भूमिका साकारण्याबरोबरच ढिशक्यांव चित्रपटाची निर्मितीही केली आहे.