दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क उद्यान परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून मनसेकडून दीपोत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे. यंदाही दिवाळीनिमित्त संपूर्ण उद्यानात दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे. मनसेच्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला मराठीसह अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. मनसेच्या दीपोत्सवाचं यंदाचं हे अकरावं वर्ष आहे.
हेही वाचा : Video: उटणं लावून अभ्यंगस्नान, औक्षण अन्…; मायरा वायकुळची ‘अशी’ झाली दिवाळी पहाट
मनसेच्या दीपोत्सवाचं यावर्षी ९ नोव्हेंबरला लेखक सलीम खान आणि गीतकार जावेद अख्तर यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आलं. हा दीपोत्सव पाहण्यासाठी दररोज शिवतीर्थावर अनेक मराठी कलाकार भेट देत आहेत. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने रविवारी तेजस्विनी पंडितने शिवार्जी पार्क परिसरात भेट दिली. यावेळी भव्य सजावट आणि तरूणाईचा उत्साह पाहून अभिनेत्री भारावून गेली. तिने राज ठाकरेंसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
तेजस्विनी पंडितने शिवतीर्थावरून राज ठाकरेंचा फोटो शेअर करत त्यांचे आभार मानले आहेत. अभिनेत्री लिहिते, “दीपोत्सव २०२३…या अनुभवासाठी खूप खूप धन्यवाद साहेब! हे सगळं तुम्हीच करू जाणे…” यामध्ये राज ठाकरे पाठमोरे उभे असून सर्वत्र फटाक्यांची आतिषबाजी होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, तेजस्विनी पंडितने मराठी कलाविश्वात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक गाजलेले चित्रपट व मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. तिच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर लवकरच ती प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे.