संजय जाधव दिग्दर्शित ‘दुनियादारी’ चित्रपट १९ जुलै २०१३ रोजी प्रदर्शित झाला. ‘दुनियादारी’ला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला तसेच बॉक्स ऑफिसवर सुद्धा या चित्रपटाने चांगले यश मिळवले. ‘दुनियादारी’ चित्रपट प्रदर्शित होऊन यंदा १० वर्ष पूर्ण होत आहेत. याच निमित्ताने चित्रपटाची संपूर्ण टीम ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी या टीमने चित्रपटाबद्दलच्या अनेक जुन्या आठवणी सांगितल्या.
‘दुनियादारी’ चित्रपटाला १० वर्ष पूर्ण होणार झाल्याने संपूर्ण टीमने झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात हजेरी लावली होती. या भागाचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यावेळी ‘दुनियादारी’च्या निर्मात्यांसह दिग्दर्शक संजय जाधव यांनी चित्रपट रिलीज झाल्यानंतरच्या काही जुन्या आठवणी सांगितल्या. निर्माते म्हणाले, “मला अजूनही तो किस्सा आठवत आहे… आम्ही सगळेजण सकाळी पुण्याला जात होतो. साधारण ९.३० वाजले होते आणि आम्हाला सगळ्यांचे मला फोन येत होते. ‘सर, तुमच्या चित्रपटाचे सगळे शो हाऊसफुल आहेत.’ तेव्हा आम्ही सर्वांनी गाड्या थांबवल्या.”
हेही वाचा : “माझं पहिलं स्वप्न वेगळं होतं”, सिद्धार्थ जाधवने केला खुलासा; म्हणाला, “इंडस्ट्रीमध्ये येण्याचा विचार…”
दिग्दर्शक संजय जाधव याविषयी सांगताना म्हणाले, “आम्ही सगळ्यांनी पुण्याला जाताना गाड्या थांबवल्या. मी स्वत: गाडी थांबवून सलग १५ मिनिटं रडत होतो.” याला जोडून अंकुश चौधरी म्हणाला, “सगळ्यांनी रस्त्यावर गाड्या थांबवल्या आणि नुसती बोंबाबोंब सुरु होती.”
हेही वाचा : इलियाना डिक्रुझने पहिल्यांदाच दाखवला होणाऱ्या बाळाच्या बाबांचा चेहरा, फोटो शेअर करत म्हणाली…
स्वप्नील जोशी पुढे म्हणाला, “आम्हाला एका चित्रपटगृहाच्या मालकाचा फोन आला होता. तो म्हणाला, ‘मला माझ्या बायकोला देण्यासाठी तिकीट नाही. चित्रपटगृहाच्या पायऱ्यांवर बसून लोक चित्रपट पाहत आहेत.’ हे ऐकल्यावर आम्ही आणखी आनंदी झालो.” दरम्यान, ‘दुनियादारी’ चित्रपटात स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी, जितेंद्र जोशी, सुशांत शेलार, सई ताम्हणकर, उर्मिला कानेटकर, रिचा परीयाली यांच्या प्रमुख भूमिका होत्या.