मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या नवनवीन प्रयोग होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. एक नवी कोरा, धमाल असलेला आणि तेवढीच हृदयस्पर्शी गोष्ट असलेला ‘एक दोन तीन चार’ हा असाच आगळंवेगळं कथानक असलेला चित्रपट येत्या १९ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन होणार असून, ही प्रत्येकासाठी हलक्या फुलक्या विनोदाची मेजवानी असणार आहे. तरुण पिढीच्या आयुष्यात प्रेम, लग्न आणि त्यानंतर येणाऱ्या गोष्टींचा प्रवास कसा असू शकतो याची खोचक पेरणी यात केलेली आहे.
‘एक दोन तीन चार’मध्ये दमदार कलाकारांची टीम पाहायला मिळत आहे. वैदेही परशुरामी, निपुण धर्माधिकारी, मृणाल कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, सतीश आळेकर, शैला घाणेकर हे कलाकर यात झळकणार आहेत. याशिवाय चित्रपटात निपुण आणि वैदेही ही जोडी पहिल्यादांच एकत्र पाहायला मिळणार आहे आणि महत्वाचं आकर्षण म्हणजे ‘फोकस इंडियन’ या नावाने प्रसिद्ध असलेला सोशल मीडिया इन्फ्लुन्सर करण सोनावणे या चित्रपटाद्वारे प्रथमच मराठी सिनेमात पदार्पण करीत आहे.
‘मुरांबा‘ या बहुचर्चित चित्रपटानंतर वरुण नार्वेकर ‘एक दोन तीन चार’ चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा दिग्दर्शनाची जबाबादारी सांभाळणार आहेत. चित्रपटाबद्दल वरुण नार्वेकर म्हणतात, “नुकतचं लग्न झालेल्या समीर (निपुण) आणि सायलीला (वैदेही) आयुष्यात एक मोठं सरप्राइज मिळतं. यामुळे सुरुवातीला दोघांनाही प्रचंड आनंद होतो. पण नंतर हळूहळू त्याचं टेन्शनही जाणवायला लागतं. आता हे सरप्राइज नेमकं काय आहे ते लवकरच प्रेक्षकांना कळेल. लग्न झालेल्या जोडप्याच्या आयुष्यात येणारा हा अनोखा ट्विस्ट बघायला सर्वांना नक्की आवडेल.”
चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद निपुण धर्माधिकारी आणि वरुण नार्वेकर यांची आहे. जिओ स्टुडिओजसह या चित्रपटाची निर्मिती रणजित गुगळे, केयूर गोडसे, निपुण धर्माधिकारी आणि नीरज बिनीवाले यांच्या बहावा एन्टरटेन्मेंट आणि १६ बाय ६४ यांनी केली आहे. आजच्या तरुण पिढीसह सर्वच वयोगटातील प्रेक्षकवर्गासाठी ‘एक दोन तीन चार’ हा चित्रपट धमाल मनोरंजनाची मेजवानी ठरेल. हा चित्रपट येत्य १९ जुलैला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.