Ekda Yeun Tar Bagha Trailer : मराठी कलाविश्वात सध्या ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तब्बल १६ दिग्गज कलाकार महाराष्ट्रातील जनतेचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘एकदा येऊन तर बघा’ या फुलंब्रीकर कुटुंबाच्या हॉटेल व्यवसायात कोणकोणते ट्विस्ट येणार? याचा उलगडा पुढच्या महिन्यात म्हणजेच ८ डिसेंबर २०२३ रोजी चित्रपटगृहात होणार आहे.
फुलंब्रीकर या सामान्य घरातील कुटुंबाला अचानक २० लाख रुपये मिळतात आणि पुढे हे तिघे भाऊ मिळून एक नवीन हॉटेल व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतात. त्यांच्या हॉटेलमध्ये नेमके कोणते पाहुणे येणार, कथानकात काय ट्विस्ट येणार? एका माणसाच्या मृत्यूनंतर फुलंब्रीकर कुटुंबासमोरच्या अडचणी कशा वाढणार हे सगळे प्रसंग चित्रपटात धमाल, कॉमेडीच्या रुपात पाहायला मिळणार असल्याचं या चित्रपटाचा ट्रेलर पाहून लक्षात आलं.
गिरीश कुलकर्णी हे फुलंब्रीकर कुटुंबाचे प्रमुख असतात. ‘एकदा येऊन तर बघा’मध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडित त्यांच्या ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका साकारत आहे. याशिवाय ओंकार भोजने व प्रसाद खांडेकर गिरीश कुलकर्णी यांचे भाऊ आणि नम्रता संभेराव चित्रपटात तेजस्विनीची बहीण असल्याचं ट्रेलरमधून स्पष्ट होतं. आता या फुलंब्रीकर कुटुंबीयांनी सुरू केलेल्या नव्या हॉटेलमधील पहिला पाहुणा कोण असणार? याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. भाऊ कदम यांनी चित्रपटात गुलाबी बाबा ही भूमिका साकारली आहे.
चित्रपटात सगळ्याच कलाकारांचे एकदम हटके लूक पाहायला मिळत आहेत. या चित्रपटाच्या लेखन-दिग्दर्शनाची जबाबदारी प्रसाद खांडेकरने सांभाळली आहे. याशिवाय चित्रपटात तब्बल १६ विनोदवीर भूमिका साकारणार आहेत. यामध्ये सयाजी शिंदे, गिरीश कुलकर्णी, तेजस्विनी पंडित, भाऊ कदम, ओंकार भोजने, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, विशाखा सुभेदार, पॅडी कांबळे, राजेंद्र शिसटकर, वनिता खरात, रोहित माने, शशिकांत केरकर, सुशील इनामदार, जय चौबे, राकेश शालिन यांचा समावेश आहे.