परेश मोकाशी यांच्या गाजलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘एलिझाबेथ एकादशी’. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या चित्रपटात श्रीरंग महाजन, सायली भांडाकवठेकर, पुष्कर लोणकर, नंदिता धुरी हे कलाकार मंडळी झळकले होते. यामधील झेंडूला म्हणजे सायली भांडाकवठेकरने साकारलेल्या पात्राला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. त्यामुळे अजूनही ‘एलिझाबेथ एकादशी’मधील झेंडूचे सीन सोशल मीडियावर व्हायरल होतं असतात.
‘एलिझाबेथ एकादशी’ चित्रपटातील सायली भांडाकवठेकरने नुकताच ‘कलाकृती मीडिया’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनलशी संवाद साधला. यावेळी तिने ‘एलिझाबेथ एकादशी’ चित्रपटातील मुक्ता उर्फ झेंडूच्या भूमिकेसाठी ऑडिशन कशी झाली होती? याबाबत सांगितलं.
सायली भांडाकवठेकर म्हणाली, “‘एलिझाबेथ एकादशी’ चित्रपटाचं ऑडिशन देताना मी इयत्ता चौथीमध्ये होते. तेव्हा पंढरपूरमधील कवठेकर प्रशाला या शाळेत परेश मोकाशी सर आणि मधुगंधा ताई हे दोघं आले होते. तिथे मी पहिल्यांदा ऑडिशन दिली. त्यानंतर मग आदर्श प्राथमिक नावाची शाळा आहे, तिथे दुसरी ऑडिशन दिली. ‘एलिझाबेथ एकादशी’ चित्रपटासाठी मी एकूण दोन ऑडिशन दिल्या होत्या. या ऑडिशन झाल्यानंतर काही मुलींना निवडल्याचा कॉल आला होता. ज्यामध्ये माझं नाव होतं. माझ्या कुटुंबात कोणालाच माहिती नव्हतं, चित्रपटाचं चित्रीकरण काय असतं? कुठे असतं? निवड झालेल्या मुलींच्या यादीत आम्ही दोन-चार जणी होतो. मी दररोज प्रशिक्षणासाठी जायचे. तेव्हा आमची पाच वाजेपर्यंत शाळा असायची आणि माझं चार वाजता प्रशिक्षण असायचं. मग मी चार वाजता आवरुन प्रशिक्षणासाठी जायचे. खूप मज्जा यायची.”
पुढे सायली भांडाकवठेकर म्हणाली की, मला असं कधी वाटलं नव्हतं की, चित्रीकरण वगैरे करणार आहोत. कारण ते आम्हाला विषय द्यायचे आणि सांगायचे, या विषयावर तुम्ही कसा अभिनय करालं? मग माझ्याबरोबर पुष्कर होता, चैतन्य होता. यांची आधीच चित्रपटासाठी निवड झाली होती. पण मुलीच्या भूमिकेसाठी झाली नव्हती. आम्ही तेव्हा अभिनय करून दाखवायचो. पण, यामध्ये काही वेगळेपण हवं असेल तर परेश सर तसं समजावून सांगायचे. हे ८ ते १० दिवस चाललं. त्यानंतर अखेर फोन आला की, तुझी चित्रपटासाठी निवड झालीये. संपूर्ण चित्रीकरण पंढरपुरात असणार आहे. त्याच्यामुळे माझ्या आई-वडिलांना प्रश्न पडला, तिने असं कधीच केलं नाही. तिची कशी काय निवड करतील? पंढरपुरात चित्रीकरण असल्यामुळे आमच्यासाठी ते बरंच होतं . पण, मी याआधी अभिनयक्षेत्रात काहीच केलं नव्हतं. मात्र ते म्हणाले, आम्ही करून घेऊ.
“त्यानंतर चित्रीकरणाला सुरुवात झाली. मग चित्रपट प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांचा खूप प्रेम मिळालं. जे अजूनही मिळतंय. खासकरून झेंडूला त्या ‘बांगड्या गरम’ या सीनमुळे खूप प्रेम मिळतंय. इन्स्टाग्रामवर नेहमी तो सीन चर्चेत असतो. १० वर्षांनंतरही असं प्रेम मिळतंय तर खूप छान वाटतंय,” असं सायली भांडाकवठेकर म्हणाली.
दरम्यान, ‘एलिझाबेथ एकादशी’ चित्रपटानंतर सायली भांडाकवठेकर काही कार्यक्रमात दिसली. ‘चला हवा येऊ द्या’ किंवा पुरस्कार सोहळ्यांमध्ये ती पाहायला मिळाली. पण, तिने ‘एलिझाबेथ एकादशी’नंतर कोणताही चित्रपट केला नाही.