राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘एलिझाबेथ एकादशी’ चित्रपट आजही प्रेक्षक तितक्याच आवडीने पाहतात. २०१४मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला १० वर्ष पूर्ण झाली. तरीही ‘एलिझाबेथ एकादशी’मधील झेंडू सगळ्यांच्या चांगलीच आठवणीत आहेत. सायली भांडाकवठेकरने मुक्ता उर्फ झेंडूची भूमिका उत्कृष्टरित्या साकारली होती. त्यामुळेच अजूनही झेंडूचे व्हिडीओ चर्चेत असतात. नुकताच झेंडू म्हणजे सायलीने ‘कलाकृती मीडिया’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनलशी संवाद साधला. यावेळी तिने ‘एलिझाबेथ एकादशी’ चित्रपटानंतर अभिनय क्षेत्र का निवडलं नाही? याविषयी सांगितलं.
सायली भांडाकवठेकर म्हणाली, “माझं पहिल्यापासून काहीही ठरलं नव्हतं की, अमूक-तमूक क्षेत्रात जायचं आहे. नशीबाने ‘एलिझाबेथ एकादशी’ चित्रपट मिळाला. तो खूप चांगला चालला. माझं काम चांगलं होतं. त्यामुळे मला असं वाटायला लागलं की, अभिनय क्षेत्रात आपण काहीतरी करू शकतो. पण, माझे वडील शिक्षक आहेत. त्यामुळे घरात शैक्षणिक वातावरण आहे. म्हणून माझं असं झालं की, आपण आधी पदवीचं ( Graduation ) शिक्षण पूर्ण करू. कारण हे अभिनय क्षेत्र भयानक आहे. इथे कधीही काहीही होऊ शकतं. आज तुमच्याकडे काम आहे आणि उद्या नसेलही, असं होऊ शकतं. त्यामुळे मला वाटतं की, यावरच फक्त अवलंबून राहायला नाही पाहिजे. माझ्याकडे काहीतरी असलं पाहिजे. जर माझं काहीच झालं नाही तर मला काहीतरी वेगळं काम करायला असलं पाहिजे. त्यामुळे हा विचारा केला आणि आधी पदवीचं शिक्षण पूर्ण करण्याचं ठरवलं.”
पुढे सायली भांडाकवठेकर म्हणाली, “मला नंतर असं वाटायला लागलं, आपण अभिनय केला. पण या क्षेत्रात अभिनयाशिवाय इतर गोष्टी आहेत. ज्या आपण करू शकतो. जसं की, टेक्निकल आहे, लेखन आहे, दिग्दर्शन आहे. मग त्या गोष्टी आपण अजून बघितल्याच नाहीयेत. आपल्याला त्या गोष्टींमध्ये रस असेल तर काय माहित ना. आपल्याला एखादी गोष्ट चांगली जमते हा एक मुद्दा असतो आणि आपल्याला एखादी गोष्ट करायला आवडते हा दुसरा मुद्दा असतो. मी म्हटलं आता ठाम निर्णय घेण्यापेक्षा सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करू. पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर पुढे या गोष्टींकडे बघू. कारण अभिनय क्षेत्र खूप मोठं आहे. तसंच यात खूप स्पर्धा आहे.”
“मराठी सिनेसृष्टीत खूप सुंदर चित्रपट येत आहेत. मराठी सिनेसृष्टी खूप विकसित झाली आहे. त्यामुळे आता जर या इंडस्ट्रीत पाऊल ठेवायचं असेल तर खूप चांगल्या गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजेत. नाहीतर उपयोग नाही. तुम्ही काहीही अभिनय करताय तर तसं नाही. कारण खूप स्पर्धा आहे. त्यामुळे तसा चांगला अभिनय करता आला पाहिजे. म्हणूनच जेव्हा अशी तयारी होईल तेव्हा अभिनय क्षेत्रात येईल,” सायली भांडाकवठेकर म्हणाली.