परेश मोकाशी दिग्दर्शित ‘एलिझाबेथ एकादशी’ चित्रपट २०१४मध्ये प्रदर्शित झाला होता. या मराठी बालपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. मधुगंधा कुलकर्णीने लिहिलेली कथा प्रेक्षकांना खूप भावली. श्रीरंग महाजन, सायली भांडाकवठेकर, पुष्कर लोणकर, नंदिता धुरी यांच्या उत्कृष्ट अभिनयाने ‘एलिझाबेथ एकादशी’ चित्रपटाला न्याय मिळवू दिला, असं म्हणायला काही हरकत आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘एलिझाबेथ एकादशी’ चित्रपटातील मुक्ता उर्फ झेंडू म्हणजेच सायली भांडाकवठेकर चांगलीच भाव खाऊ गेली. तिचा “बांगड्या गरम, बांगड्या गरम…” हा सीन सुपरहिट झाला. अजूनही सोशल मीडियावर या सीनचे व्हिडीओ व्हायरल होतं असतात. पण, ‘एलिझाबेथ एकादशी’मधील सायली सध्या काय करते? जाणून घ्या…
‘एलिझाबेथ एकादशी’ चित्रपटाला १० वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे या चित्रपटातील बालकलाकार आता खूप मोठे झाले असून विविध माध्यमांमध्ये शिक्षण घेत आहेत. यामधील सायली भांडाकवठेकरने नुकताच ‘कलाकृती मीडिया’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनलशी संवाद साधला. यावेळी सध्या ‘एलिझाबेथ एकादशी’मधून घराघरात पोहोचलेली झेंडू काय करते? हे समोर आलं.
सायली भांडाकवठेकर म्हणाली, “‘एलिझाबेथ एकादशी’ चित्रपटाचं चित्रीकरण आणि प्रदर्शित होऊन १० वर्ष झाली. त्यामुळे चेहेरेपट्टी बदलली आहे. म्हणून मला आता ओळखता येत नाहीये. सध्या मी दुसऱ्या वर्षात आहे. पुण्याच्या एका कॉलेजमध्ये फिजिओथेरपीचं शिक्षण घेतेय. माझी लवकरच माझी परीक्षा आहे. त्यामुळे सध्या त्याची तयारी सुरू आहे. म्हणून आता डोक्यामध्ये फक्त विचार फिजिओथेरपीमधून पदवी घेण्याबाबतचं आहे.”
दररोजच्या रुटीनबाबत सांगताना सायली म्हणाली की, दुसरं वर्ष सुरू असल्यामुळे ओपीडी (OPD) वगैरे असतात. सकाळी ९, १० वाजल्यापासून ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत माझं कॉलेज असतं. तेव्हाचं सगळं ओपीडी, क्लिनिकल वगैरे होऊन जाते, असं माझं रुटीन असतं. मेडिकल कॉलेज असल्यामुळे बंक करता येते नाही. ७५ टक्के हजेरी अनिवार्य आहे. पण, मज्जा येते. कारण पहिल्यांपासून मला पुण्यात शिक्षण घेण्याची खूप ओढ होती. सगळ्याचं गोष्टीमध्ये पुणे छान आहे. शिकायला भरपूर मिळतं. पण, स्पर्धा खूप आहे. सध्या सगळंकाही कलरफुल आहे, असं नाही म्हणू शकतं. मात्र, ठीक आहे. फेस्ट वगैरे होतात. तेव्हा एन्जॉय करते.”
दरम्यान, ‘एलिझाबेथ एकादशी’ चित्रपटानंतर सायली भांडाकवठेकर काही कार्यक्रमात दिसली. ‘चला हवा येऊ द्या’ किंवा पुरस्कार सोहळ्यांमध्ये ती पाहायला मिळाली. पण, तिने ‘एलिझाबेथ एकादशी’नंतर कोणताही चित्रपट केला नाही.