मराठी चित्रपट आणि त्यांना मिळणारे कमी शोज हा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात मराठी चित्रपटांना म्हणावे तसे शोज आणि स्क्रीन्स मिळत नसल्याने प्रत्येक निर्माता आणि दिग्दर्शक नाराज आहे. नुकतंच भाऊराव कऱ्हाडे यांच्या ‘TDM’ या चित्रपटाला शो न मिळाल्याने हा मुद्दा चर्चेत आला. हे प्रकरण इतकं वाढलं की यातील कलाकारांना कॅमेरासमोर अश्रू अनावर झाले होते. नंतर काही दिवसांनी हा चित्रपट खुद्द भाऊराव कऱ्हाडे यांनी पुन्हा काढून घेतला.
एकंदरच मराठी चित्रपटांची होणारी गळचेपी हा विषय सुरू असतानाच आता पुन्हा एका मराठी चित्रपटाला शो मिळत नसल्याचा एका दिग्दर्शकाने खुलासा केला आहे. ‘फकाट’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक श्रेयश जाधव यांनी याबद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
आणखी वाचा : “उर्दू ही केवळ भारतातच बोलली जाते…” नसीरुद्दिन शाह यांचं मोठं विधान
२ जूनला ‘फकाट’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. एकीकडे हा चित्रपट प्रेक्षकांना आवडत आहे, पण दुसरीकडे याचे शोज कमी होत आहेत अशी खंत दिग्दर्शक श्रेयश जाधव यांनी व्यक्त केली आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, “जर लोकांना चित्रपट आवडला नाही आणि शोज कमी झाले असते तर मी समजू शकलो असतो, पण इथे नेमकं होतंय उलटंच. लोकांपर्यंत चित्रपट पोहोचायला वेळ लागतो आणि या चित्रपटगृहांनी तेवढा वेळ प्रेक्षकांना द्यायला हवा असं माझं मत आहे. त्यामुळे चित्रपटगृहांनी ‘फकाट’चे शोज कमी करू नयेत तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला वेळ द्यावा ही विनंती करतो.”
इतकंच नव्हे तर हा चित्रपट पाहून जर कुणाला एकदाही हसू आलं नाही तर तिकिटाचे पैसे परत करायचीही तयारी दिग्दर्शकाने दाखवली आहे. या चित्रपटात हेमंत ढोमे आणि सुयोग गोऱ्हे ही जोडगोळी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. याबरोबरच अभिनेते अविनाश नारकर, नितीश चव्हाण यांच्याही प्रमुख भूमिका पाहायला मिळणार आहेत. ‘फकाट’च्या दिग्दर्शकाच्या या पोस्टमुळे पुन्हा मराठी चित्रपटांना मिळणारे शोज हा विषय चर्चेत आला आहे.