अभिनेता अक्षय कुमारची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. या चर्चांचे मुख्य कारण म्हणजे महेश मांजरेकर दिग्दर्शित त्याचा आगामी मराठी चित्रपट ‘वेडात मराठे वीर दौडले सात.’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार साकारणार आहे. काल त्याने या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. यानिमित्त त्याने एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली.
अक्षयने इन्स्टाग्रामवर त्याचा एक फोटो पोस्ट केला. या फोटोत तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला नमस्कार करताना दिसत आहे. अक्षयच्या या भूमिकेसाठी केवळ प्रेक्षकच नव्हे तर कलाकार मंडळीदेखील खूप उत्सुक आहेत. अजय देवगण, शरद केळकरपासून अगदी गुलशन ग्रोवर पर्यंत कित्येक कलाकारांनी अक्षय कुमारला शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर मात्र या व्हिडिओमुळे अक्षयला प्रचंड ट्रोल केलं जात आहे. मुळात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत अक्षय कुमार अजिबात शोभून दिसत नसल्याचं नेटकऱ्यांनी म्हंटलं आहे.
आणखी वाचा : मुलगी अभिनेत्री अन् मुलगा बनणार लेखक; शाहरुख खानचा लेक आर्यन खान पदार्पणासाठी सज्ज
शिवाय अक्षयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्याच्या डोक्यावर बल्बचं एक झुंबर पाहायला मिळत आहे. यावरूनही अक्षयला आणि खासकरून दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची खिल्ली उडवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा कार्यकाळ आणि थॉमस अल्वा एडिसनने लावलेला बल्बचा शोध या काळात प्रचंड तफावत असल्याचं कित्येक नेटकऱ्यांनी निदर्शनास आणून दिलं आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक अक्षय इंदिकर यांनीदेखील या व्हिडिओचा स्क्रीनशॉट शेअर करत लिहिलं आहे, “थॉमस अल्वा एडिसनच्या आधी मराठी सिनेमात ब्लबचा शोध लागला होता.”
या गोष्टीवरून सोशल मीडियावर सध्या प्रचंड टीका होत आहे. प्रेक्षक त्यांच्या खास शैलीत अक्षय कुमार आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यावर टीका करत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं की, “महेशरावांनी लावलेले ‘दिवे’ पाहता मुघल स्वराज्यावर फायटर विमानांमधून चाल करून आले होते असं दाखवलं नाही म्हणजे मिळवलं.” एकूणच पाहता या व्हिडिओवर मिश्र प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळत आहे. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची कथा पराग कुलकर्णी यांची असून पटकथा महेश मांजरेकर, पराग कुलकर्णी यांची आहे, तर संवाद संजय पवार यांनी लिहिले आहेत.