महाराष्ट्रातील राजघराणी त्यांचा वारसा, परंपरा, वंशज याबद्दल सामान्य लोकांना नेहमीच उत्सुकता असते. कोल्हापूरच्या राजघराण्याचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून संभाजीराजे छत्रपती यांना ओळखलं जातं. मराठा आरक्षण व गड किल्ल्यांच्या संवर्धनाच्या लढ्यात ते अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत. याशिवाय राज्यसभेवर जाणारे कोल्हापूरचे पहिले खासदार म्हणून देखील ते ओळखले जातात. राजकीय क्षेत्रातील हे चर्चेतील नाव लवकरच मराठी सिनेसृष्टीत मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.
संभाजीराजे छत्रपती हे आगामी काळात कोणत्या चित्रपटात काम करणार? चित्रपटात ते कोणती भूमिका साकारणार? याविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झालेली आहे. चित्रपटात काम करण्याविषयी संभाजीराजेंनी ‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे. यावेळी त्यांनी राजकीय मुद्द्यांवर आपली मतं मांडलीच मात्र, लवकरच एका मराठी बायोपिकमध्ये त्यांच्या वंशजांची महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती येत्या काळात सुप्रसिद्ध मराठी दिग्दर्शकासह काम करणार आहेत. याबद्दल सांगताना ते म्हणाले, “मला काही दिवसांपूर्वी नागराज मंजुळेंचा फोन आला होता. ते लवकरच खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. खाशाबा जाधव यांना त्यावेळी आमचे आजोबा शहाजी महाराजांनी आर्थिक मदत केली होती. त्यामुळे शहाजी महाराजांची भूमिका तुम्ही करू शकता का? असं त्यांनी मला विचारलं. माझी चेहरेपट्टी, आवाज, माझं नाक यात त्यांना बरंच साम्य जाणवलं. त्यामुळे ही भूमिका मी करावी असा त्यांचा आग्रह होता. त्यानुसार मी आमचे आजोबा शहाजी महाराजांची भूमिका स्वीकारली आहे.”
हेही वाचा : “अभिनंदन बायको!” मुग्धा वैशंपायनला पदव्युत्तर पदवी; प्रथमेश लघाटे आनंद व्यक्त करत म्हणाला, “तुझा खूप…”
दरम्यान, खाशाबा जाधव यांनी हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिंपिक कुस्ती स्पर्धेत १९५२ मध्ये भारताला कुस्तीमधील पहिलं पदक मिळवून दिलं आहे. देशासाठी एवढी मोठी कामगिरी केलेल्या खाशाबा जाधव यांचं नाव भारतीय इतिहासात सुवर्णाक्षराने कोरलं गेलं आहे. लवकरच यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती ‘सैराट’ फेम सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे करणार आहे.