Fussclass Dabhade Teaser : हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे!’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये प्रेक्षकांना दाभाडे कुटुंबीयांची कथा पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच यामधलं ‘यल्लो यल्लो’ हे हळदीचं जबरदस्त गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. त्यावेळी या चित्रपटातल्या दाभाडे कुटुंबाची तोंडओळख प्रेक्षकांना झाली होती. मात्र नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमधून ही दाभाडे फॅमिली का फसक्लास आहे, याचा अंदाजही प्रेक्षकांना आला आहे. ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. हेमंत ढोमे लिखित, दिग्दर्शित या चित्रपटात क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरिष दुधाडे, राजन भिसे, राजसी भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
‘फसक्लास दाभाडे’ ( Fussclass Dabhade ) चित्रपटात प्रेक्षकांना दाभाडे कुटुंबाची गोष्ट पाहायला मिळणार आहे. हसत-खेळत आयुष्य जगणं, यादरम्यान भावंडांमध्ये झालेले वाद या गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळतील. पण, कितीही वाद झाले तरी, या कुटुंबीयांमध्ये किती घट्ट बॉण्डिंग आहे याची प्रचितीही टीझर पाहून येते. दाभाडेंच्या घरातील या तीन खांबांना भेटणं म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे. हे तीन खांब म्हणजे तायडी ( क्षिती जोग ), पप्पू ( सिद्धार्थ चांगेकर ), सोनू ( अमेय वाघ ).
दिग्दर्शक हेमंत ढोमे काय म्हणाला?
चित्रपटाचा दिग्दर्शक हेमंत ढोमे याविषयी म्हणतो, “फसक्लास दाभाडे’ हा फक्त एक चित्रपट नाही तर कुटुंबातील विविध पैलूंना हसत-खेळत उलगडणारी एक सफर आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातल्या जुन्या क्षणांचा, आपल्या कुटुंबाच्या प्रत्येक आठवणींना उजाळा देणारा एक फोटो अल्बमच आहे. प्रत्येकाला हा चित्रपट आपलासा वाटेल याची खात्री आहे.”
तर, निर्माते भूषण कुमार म्हणतात, “फसक्लास दाभाडे’ ( Fussclass Dabhade ) हा चित्रपट कुटुंबातील प्रत्येकासाठी खास असणारा आहे. प्रत्येक वयोगटासाठी असणारा हा चित्रपट प्रेक्षकांनी सहकुटुंब पाहावा. हा चित्रपट पाहाताना यातील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आपल्याच घरातील भासतील. चेहऱ्यावर हास्य आणणारा हा चित्रपट आवर्जून बघावा.”
खुळ्या भावंडांची ही इरसाल स्टोरी प्रेक्षकांना २४ जानेवारीपासून मोठ्या पडद्यावर पाहाता येणार आहे. टी-सीरीज, कलर येल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी निर्मित ‘फसक्लास दाभाडे’चे भूषण कुमार, कृष्ण कुमार, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्माते आहेत. ‘झिम्मा’च्या यशानंतर प्रेक्षकही या चित्रपटाची ( Fussclass Dabhade ) आतुरतेने वाट पाहत आहेत.