दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २: द रुल’ हा यंदाच्या वर्षातला त्याचा बिगबजेट चित्रपटांपैकी एक आहे. येत्या १५ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. आतापर्यंत चित्रपटाचा टीझर आणि दोन गाणी प्रदर्शित झाली आहेत. पण या टीझर आणि दोन गाण्यांनी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. ‘पुष्पा-पुष्पा’ व ‘अंगारों’ या गाण्यांनी तर अक्षरशः प्रेक्षकांना वेड लावलं आहे. ‘पुष्पा-पुष्पा’मध्ये फक्त अल्लू अर्जुन झळकला होता. पण ‘अंगारों’ या गाण्यात अल्लू अर्जुन व रश्मिका मंदानाची केमेस्ट्री पाहायला मिळाली. सध्या या गाण्याने धुमाकूळ घातला आहे. अशातच ‘अंगारों’ आणि निळू फुलेंच्या गाण्याच्या मॅशअपने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हे मॅशअप पाहून निळू फुलेंची मुलगी गार्गी फुले यांनी कौतुक केलं आहे.
सोशल मीडियावर रोहित वाघमारे नावाचा रॅपर, संगीतकार हा नेहमी दोन वेगवेगळ्या गाण्यांचे मॅशअप करत असतो. मग ते हिंदी-मराठी असो किंवा दाक्षिणात्य-मराठी असो त्याने केलेले सर्वच मॅशअप गाणी हीट झाली आहेत. अशाच प्रकारे रोहितने ‘पुष्पा २: द रुल’मधील ‘अंगारों’ आणि निळू फुलेचं ‘आली ठुमकत, मान मुरडत’ या दोन गाण्यांचं मॅशअप केलं आहे. त्याचं हे मॅशअप सध्या चांगलंच व्हायरल झालं असून कलाकार मंडळींसह नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे.
निळू फुले यांची मुलगी गार्गी फुलेंनी रोहितने केलेल्या मॅशअप गाण्याचा व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर केला. हा व्हिडीओ शेअर करत गार्गी फुलेंनी लिहिलं, “कमाल…बाबाचं गाणं आणि सामे.” याशिवाय रोहितच्या व्हिडीओवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “खूप छान”, असं त्यांनी लिहिलं आहे.
हेही वाचा – ‘मुरांबा’ मालिकेतून स्मिता शेवाळेची एक्झिट, आता जान्हवीच्या भूमिकेत झळकणार ‘काव्यांजली’ फेम अभिनेत्री
रोहितने केलेलं ‘अंगारों’ आणि ‘आली ठुमकत, मान मुरडत’ या गाण्यांचा मॅशअप व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे. २४ तासांत या व्हिडीओला ३ मिलियन व्ह्यूज मिळाले होते. आता हा आकडा ५ मिलियनवर पोहोचला आहे. तसंच ५ लाखांहून अधिक जणांनी लाइक केलं असून ३ हजारांहून अधिक जणांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. रोहितच्या या मॅशअपवर अनेक जण आता रील करत आहेत.